कृषी

“विद्यापीठ आपल्या दारी” या कार्यक्रमांतर्गत सडे येथे ऊस पिकाला ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक

राहुरी | जावेद शेख : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या प्रेरणेने “विद्यापीठ आपल्या दारी” या अभिनव कार्यक्रमांतर्गत विद्यापीठ मध्यवर्ती परिसरातील विद्यापीठ प्रकल्पग्रस्त सहा गावांतील शेतकर्यांना विद्यापीठाने विकसीत केलेले आधुनिक तंत्रज्ञान कृती प्रात्यक्षिकांद्वारे प्रसारीत करण्यात येणार असल्याचे आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. महानंद माने यांनी सांगितले.

त्याच अनुषंगाने आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, शेतकरी शास्त्रज्ञ मंच या योजने अंतर्गत मु.पो. सडे, ता. राहुरी, जि. अहमदनगर येथील शेतकर्यांच्या शेतावर भेट देवून शेतकर्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रगतशील शेतकरी मच्छिंद्र धोंडे, बाबासाहेब धोंडे, सडे गावाचे उपसरपंच प्रकाश धोंडे व गावातील इतर शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकर्यांच्या शास्त्रज्ञांनी समस्या जाणुन घेतल्या. शास्त्रज्ञ डॉ. सुभाष घोडके यांनी ऊस पिकांची पाहणी केली व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदान केले आणि त्यावरील उपाययोजना शेतकर्यांना सांगितल्या. कृषि विद्यापीठाचे कृषि यंत्रे व शक्ती विभागाचे प्रमुख डॉ. सचिन नलावडे यांनी सेंटर ऑफ एक्सेलंस प्रोजेक्ट मधील संशोधन सहयोगी डॉ. नीलकंठ मोरे, डॉ. भणगे यांनी सडे शिवारातील ऊस पिकाला ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविले.

यावेळी डॉ. सचिन नलावडे यांनी ड्रोन फवारणीबाबत विविध शंकांचे निरसन केले. डॉ. महानंद माने यांनी ऊस पिकातील पाणी व्यवस्थापनसंदर्भात माहिती दिली. डॉ. सुभाष घोडके यांनी ऊस पिकातील मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन, ऊसाच्या प्रमुख वाण, उसावरील रोग व किडी व्यवस्थापनासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

यावेळी भाऊसाहेब शेटे, भाऊसाहेब पानसंबळ, अनिल खेडेकर, बापूसाहेब धोंडे, दत्तात्रय म्हसे व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे कृषि सहाय्यक शेषराव देशमुख, शरद बेल्हेकर, सौ. अर्चना सोनवणे, अनिकेत खंडागळे यांनी सदर कार्यक्रम आयोजनासाठी परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button