मनोरंजन

‘अप्सरा’ चित्रपट १० मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार

देवळाली प्रवरात माध्यमांशी साधला संवाद

जावेद शेख : प्रेम, राजकारण, ॲक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी ‘अप्सरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांना – मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून चित्रपट १० मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलावंत, निर्माता व दिग्दर्शक यांनी देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहाच्या कार्यालयात माध्यमांशी संवाद साधून जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा पाहावा, असे आवाहन केले आहे.

या चित्रपटाची निर्मिती सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे करण्यात आली असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले असून त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. गायक अभय जोधपूरकर, गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. ही गीते प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहेत.

अभिनेता सुयश झुंजुरके, अभिनेत्री मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, अभिनेत्री मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, मयूर पवार, सचिन कुमावत, विजय निकम, राजेश भोसले, आशिष वारंग, समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन, संघर्ष भालेराव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. राजा फडतरे यांनी छायांकन, निलेश राठोड यांनी संकलन, सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर, कृतिक माझिरे यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे.

एका तरुणाच्या मनात असलेलं एका अप्सरेचं चित्र, त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर ‘अप्सरा’ हा चित्रपट बेतला आहे. अनोखी प्रेमकथा अप्सरा चित्रपटाच्या ट्रेलरमधून कथेचा अंदाज येतो. तरुणाला भेटणारी त्याच्या मनातली अप्सरा आणि त्यानंतर होणारं राजकारण, त्या सगळ्याला तो तरूण कसा सामोरा जातो याचं कथानक चित्रपटात आहे. गाणी, उत्तम अभिनय या सर्वाना ॲक्शनची जोडही कमालीची आहे. चैतन्य उद्योग समूहात गणेश दादा भांड यांनी सर्व कलाकारांचा सन्मान केला आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.
Back to top button