ठळक बातम्या

इपीएस पेन्शनधारकांना लवकरच गोड बातमी – कमांडर राउत

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ पेन्शन धारकांना लवकरच निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी गोड बातमी सर्वांच्या एकजुटीच्या संघर्षामुळे आपल्या सर्वांना मिळणार असल्याचे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांनी साई पालखी निवारा शिर्डी येथे २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय पेन्शनर्स भव्य मेळाव्यात सांगितले.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खा भाऊसाहेब वाकचौरे हे होते. कमांडर राउत यांनी सांगितले की आपल्या देशाच्या औद्योगिक प्रगतीत आपला सर्वांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. एव्हढे सर्व केल्यावर लढण्याची ताकद ह्या वृद्ध पेन्शनर्समध्ये आहे. आपल्याला पेन्शनवाढ १०० टक्के मिळणार आहे. ते फक्त आपल्याच संघटनेचे यश आहे. कोणत्याही राजकीय शक्तीचा आधार न घेता लढाई जिंकलेली आहे. त्यासाठी अनेक मान्यवरांनी लोकसभेत आवाज उठविला आहे.

पण आता विविध पदाधिकारी यांचेबरोबर चर्चा करून सविस्तर अहवाल व प्रस्ताव दिला आहे. वैद्यकीय सुविधा सुद्धा देण्यात येईल तसे आश्वासन इपीएफओ अधिकारी, सचिव यांनी दिले आहे. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनीही मेळाव्यास उपस्थित राहून मनोगत व्यक्त करताना सांगितले की, इपीएस ९५ पेन्शनर्स यांचा जो लढा आहे त्यासाठी खासदार असताना व नसताना सुद्धा वेळोवेळी हजर राहिलो, सहभागी होतो व आजही सहभागी झालो आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सतत राष्ट्रीय संघर्ष समितीबरोबर असणार आहे. सूत्रसंचालन देवीसिंगआण्णा जाधव, पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, सुभाष पोखरकर, राष्ट्रीय महिला आघाडी शोभाताई आरस, सुहास वहाडणे हे होते. मेळाव्यास महिला आघाडी उपाध्यक्ष श्रीमती आशाताई शिंदे, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, शहराध्यक्ष दशरथ पवार, अशोक देशमुख, बापूराव बहिरट, भगवंत वाळके,  विनायक लोळगे, सुरेश कटारिया यांच्यासह राज्यातील पदाधिकारी तसेच हजारो पेन्शनर्स उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button