कृषी

कृषि पदवीधरांनी उद्योजक व्हावे – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

कृषि क्षेत्रात उद्योजकतेला अमर्याद संधी, विद्यार्थ्यांनी डोळसपणे बघणे गरजेचे

राहुरी विद्यापीठ : शेतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. शेती या विषयात शिक्षण घेवून शेती व्यवसायातच उद्योजक म्हणुन नांव कमवलेले अनेक जण आपण पाहतो. त्यांना प्रत्येकाला सुरुवातीला अपयशाला तोंड द्यावे लागले. परंतु, या अपयशातूनच त्यांनी मिळालेल्या संधीचा फायदा घेवून आपले कौशल्य विकसीत करुन शेतीमधील विविध व्यवसायात नांव मोठे केले आहे. सध्या कृषि शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या व्यवसाय करण्यासंबंधीच्या नाविन्यपूर्ण कल्पना असतील किंवा काही कंपन्याशी संबंधीत संशोधनाचे मुद्दे शोधुन त्या मुद्यांवरच आपली एम.एससी. किंवा आचार्य पदवी मिळविण्यासाठी काम करावे, जेणेकरुन त्यांना भविष्यात त्यांच्या संशोधनाचा फायदा होऊन स्वतःचा उद्योग सुरु करता येईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात कृषि उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन करण्याकरीता कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बंगलोर येथील भारत ॲग्रीप्रुनर्स या कंपनीचे इंजि. सदानंद कुलकर्णी व सौ. शर्मिला कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी अधिष्ठाता तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. साताप्पा खरबडे व सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ उपस्थित होते.

यावेळी इंजि. सदानंद कुलकर्णी यांनी त्यांच्या भारत ॲग्रीपुनर्स या कंपनीच्या माध्यमातून ते करीत असलेल्या कामाबद्दल माहिती देतांना म्हणाले की एखादे संशोधन व त्या संशोधनाचे व्यवसायीकरण होणे यात मोठा गॅप आम्हाला आढळला. एखादे प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर ते मार्केटमध्ये विकले जाण्यासाठी सर्वार्थाने योग्य आहे की नाही हे तपासणे महत्वाचे असते. त्याकरीता जे उपाय लागतात त्याचे कंपनीमार्फत प्रशिक्षण दिले जाते. सौ. शर्मिला कुलकर्णी या आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या की आमची कंपनी म्हणजे एक कौशल्य पुरविणारे ट्रेनिंग सेंटर आहे. तुमच्या ज्या काही नाविन्यपूर्ण कल्पना असतील त्यांना व्यवसायात रुपांतर करण्यासाठी आम्ही पुर्ण नेटवर्क सपोर्ट तसेच मार्गदर्शकाचे काम करतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व ओळख डॉ. राजेंद्र वाघ यांनी करुन दिली. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button