पश्चिम महाराष्ट्र

विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान म्हणजे सेवाभावाचे प्रेरणास्थळ -डॉ.सुभाष वाघमारे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : सुखदेव सुकळे यांनी स्थापन केलेले विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान हे मानवसेवेचे प्रेरणास्थळ असून त्यांचे उपक्रम म्हणजे माणुसकीचे दर्शन आहे. प्रेमाने माणसे जोडत जाणे हाच खरा धर्म असून आपल्या वागण्याबोलण्यात असावा, असे मत सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सातारा येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डॉ. वाघमारे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर येथील बोरावके कॉलेजचे सेवानिवृत्त मराठीचे प्रा. डी.ए. माने होते. प्रारंभी स्व. सौ.पुष्पाताई सुकळे यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

डॉ. सुभाष वाघमारे आपल्या भाषणात पुढे म्हणाले, ‘जीवन हे अनेक दुःखांनी भरलेले असून माणूस म्हणून जगत असताना प्रेम हाच सर्वांचा आधार आहे. आपले अस्तित्व क्षणभंगुर आहे हे ध्यानात ठेवून माणसाने माणसाशी नीट वागायला पाहिजे. लोक आपल्या घरातील सुरकुत्या पडलेल्या म्हाताऱ्या माणसांना दूर दूर करीत आहेत. आपल्याला ज्यांनी चांगले संस्कार दिले, प्रेम दिले, जगवले त्यांच्या विषयी कृतज्ञता असणे आवश्यक आहे. सोन्याच्या अंगठ्या घालून दिमाख दाखवणे यात माणूसपण नाही. इतरांच्या कल्याणासाठी नि:स्वार्थी वृत्तीने काम करणारी माणसे हेच जग घडवत असतात.

आज सगळ्यांना पैसे हवे आहेत. माणसे नको आहेत. सुकदेव सुकळे यांना आधार देऊन आनंदा मुळीक यांनी माणुसकी दिली. त्यांनी आपले आयुष्य घडवले ही जाणीव ठेवून सर्वांच्या कल्याणाचे काम सुकदेव सुकळे करीत आहेत, सदाचरणी, करुणाशील अन्तःकरणाचे सुकदेव सुकळे हे आपल्या पत्नी स्व.सौ. पुष्पाताई सुकळे यांच्या नावाने विजया क्षीरसागर यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन वार्धक्यात जाणिवेने कृतज्ञता व्यक्त करतात ही बाब मनाला गारवा देणारी आहे.

आज सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक ठिकाणी सेवाभावी माणसे नाकारली जातात यात माणुसकी नाही. भेदभाव करण्यात जिंदगी घालवणे योग्य नाही. खरे तर प्रेमाने माणसे जोडत जाणे हाच खरा धर्म आहे, डॉ. बाबुराव उपाध्ये हे माझे सातारा येथील गुरुवर्य आहेत. 1985 मध्ये त्यांचे ‘पोरका’ हे आत्मकथन वाचून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेण्यास प्रवृत्त झालो. त्यांचे जीवन आणि माझे जीवन सारखेच आहे, आज मात्र गुणी माणसांची दखल घेतली जात नाही.

 ” कंपूत माणसांची आता फारच गर्दी झाली, त्यांच्या मर्जीमधल्या पदावर भरती केली.”

   अशी खंतकविता सादर केली. सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी विविध संदर्भ देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सातारा येथील सुपनेकर हॉलमध्ये विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान श्रीरामपूर यांनी आयोजित केलेल्या श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे येथील माणिक कासट बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ.विजया प्रकाश क्षीरसागर यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती व पुरस्कार प्रदान समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते .या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डी.ए.माने, सुकदेव सुकळे, प्रकाश क्षीरसागर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

जीवनात कृतज्ञता महत्वाचे असल्याचे सांगत डॉ. वाघमारे पुढे म्हणाले ‘कधी काळी चंद्रपूर परिसरातील उसगावहून श्रीरामपूर येथे आलेले सुकळे स्वत: च्या पेन्शन मधून २५ टक्के खर्च करून समाजसेवा करतात, साहित्य पुरस्कार देतात, हे सगळे अतिशय तळमळीने आपुलकीचा संवाद करतात. उपकाराची जाणीव ठेवून कृतज्ञता व्यक्त करतात. निष्ठेने नाती निर्माण करतात. चांगले पर्यावरण महादेव मळ्यात त्यांना मिळाले त्यातून त्यांनी सत्शील राहिले. वृद्धाश्रमाला लाख रुपये दिले. निर्व्यसनी राहणे सध्याच्या काळात आवश्यक आहे. आज लोकांना पैशाचा, जमिनीचा, खोट्या प्रतिष्ठेचा गर्व जाणवतो. जिथे अहंकार असतो तिथे माणुसकी नसते. जिथे नम्रता, कृतज्ञता असते तिथे प्रेम फुलत असते. आपली मुले चांगल्या गोष्टी घडवतील यासाठी उत्तेजन द्यावे. गौतम बुद्धांचे पंचशील हे सुखी जीवनाचा मार्ग आहे. सुख घमेंड करून मिळत नाही तर ते हातून चांगल्या गोष्टी घडल्याने मिळते, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा.डी.ए.माने म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेत श्रीरामपूर, सातारा येथे काम केलेले सुकदेव सुकळे यांनी सातारा शहरात येऊन विजयाताई यांना पुरस्कार दिला ही खूप चांगली गोष्ट आहे. कर्मवीर, संत गाडगेबाबा यांचे जीवनाचे उदात्त संस्कार, संत तुकाराम यांची करुणाशील वृत्ती हे आपल्याला प्रेरणा देणारे आहे. सुकळेसर यांचे कार्य गाडगेबाबांसारखे आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड ही मोठी माणसे होती. सयाजीराव महाराज यांनी पिठले भाकर खाल्ले. आपली संस्कृती अशी आपुलकीची आहे. हा पुरस्कार संस्कृती शिकवतो. स्व. प्रपंच चांगला करून समाजही चांगला ठेवणे महत्वाचे असते. सावित्रीबाई, अहिल्याबाई, संत गाडगेबाबा, ॲड.रावसाहेब शिंदे, रामशेठ ठाकूर यांनी खूप चांगले कार्य केले. जगासाठी देण्याची भावना ज्यांच्याकडे असते ती माणसे मोठी होतात.‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हा साने गुरुजी यांचा संदेश आचरणात आणुयात, असे आवाहन प्रा. माने यांनी सांगून श्रीरामपूरच्या आठवणी सांगितल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वलक्ष्मी प्रतिष्ठानचे सुकदेव सुकळे यांनी केले. साहित्यिक प्रा. डी.ए.माने यांचे हस्ते विजयाताई क्षीरसागर यांना मानपत्र, साडी, शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सौ. माधुरी उत्तेकर, शुभ्रा शैलेश क्षीरसागर यांनी मनोगते व्यक्त केली. शैलेश क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. शमिका शैलेश क्षीरसागर या मुलीचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास साताऱ्यातील शिक्षण प्रसारक संस्था करंजेचे सचिव तुषार पाटील, निवृत्त नायब तहसीलदार चंद्रकांत उत्तेकर, चंद्रकात पवार, बाळकृष्ण जाधव, अभिजित किर्दत, प्रा.सुरेश गायकवाड, अनिरुद्ध क्षीरसागर अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजीव शिंदे, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके, समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये आदिंनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. संजय बुरकुले, सौ.सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले, श्रीमती डेकोरे यांनी नियोजनात भाग घेतला. सुकळे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button