श्री गणेश कारखाना निवडणूक छाननी बद्दल संशयास्पद हालचाली सुरू – डाॅ एकनाथ गोंदकर
लोणी : श्री गणेश कारखाना निवडणुकीत १९ जागेसाठी १०६ अर्ज आलेले असून या अर्जाची छाननी ही उद्या २२ मे रोजी पार पडणार आहे. सदर निवडणूक प्रक्रिया ही सहकार कायदा व पोटनियमच्या तरतुदी नुसार सुरू आहे. त्यानुसार छाननी प्रक्रिया राबविली जाणे आवश्यक आहे. मात्र एका वरिष्ठ राजकीय नेत्याची व निवडणूक निर्णय अधिकारी यांची गुप्त बैठक होऊन नियमांना हरताळ फासण्याची व्युव्हरचना आखली जात आहे का ? असा संशय डाॅ. गोंदकर यांनी व्यक्त केला आहे.
दिवसेंदिवस उत्सुकता आणि नाट्यमय घडामोडी होणारी गणेश कारखाना निवडणूक एका गोपनीय बैठकीने संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. गोर गरीब सभासद शेतकरी यांचे विशेषतः अनुसूचित जाती व जमाती महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती व जमाती यांना असलेला संविधानिक हक्क डावलण्याचे हेतूने कायदा व नियम यांना धाब्यावर बसवून निवडणूकितुन बाद करण्याचा डाव बड्या नेत्याकडून व अधिकाऱ्यांकडून आखला जात आहे, अशी माहिती मिळत आहे. मात्र अशी अन्यायकारक प्रकिया राबविली गेल्यास संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पदाचा दुरुपयोग केला तर आम्ही आत्मदहन करण्यासही मागे पुढे बघणार नाही असा इशारा डाॅ एकनाथ गोंदकर यांनी दिला आहे.
गोर गरीब सभासदांच्या त्यागातून उभारलेला हा कारखाना ताकतीच्या जोरावर नियम डावलून कोणी लुबाडू पाहत असेल तर शेतकरी त्यांची गय करणार नाही व त्या अधिकारी आणि दबाब टाकणाऱ्या नेत्याच्या नावाने आत्मदहन करून निषेध व्यक्त करू, अशी संतप्त भावना उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अनेक सभासदांची झाली आहे.