कृषी

प्रा. डॉ. आनंद सोळंके यांचे मनोगत आणि ऋणनिर्देश

मित्रहो,

महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या धुळे येथील शासकीय कृषी महाविद्यालयात १९९२ मध्ये सहाय्यक प्राध्यापकपदी रुजु होऊन आज मला जवळपास ३१ वर्ष पूर्ण होत आहेत. मागील काही वर्षांपासुन मी कृषीविद्या विभाग प्रमुख, प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) आणि प्रमुख शास्त्रज्ञ (पाणी व्यवस्थापन प्रकल्प) या पदांवर सेवारत असून आज ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी विद्यापीठाच्या एकूणच शिक्षण, संशोधन, कृषी विस्तार, प्रशासकीय सेवा आणि महात्मा फुलेंच्या नावाने ओळखल्या जाणा-या या प्रिय, पवित्र कर्मभुमितून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे.

तीन दशकांहून अधिकच्या या प्रदीर्घ सेवा कालावधीत विद्यापीठ, शासन आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदा, कार्यशाळा, अभ्यास दौरे आणि उपक्रमांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या अनेक संधी मला प्राप्त झाल्यात. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे युरोपीय देशांत गेलेल्या शेतकरी दौऱ्याचा मार्गदर्शक म्हणुन नेतृत्त्व करण्याची सुवर्णसंधीही मला प्राप्त झाली. आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यांमुळे अनेकानेक देश आणि तेथील संशोधनातील प्रगती मला प्रत्यक्ष अभ्यासता आली, हे मी अतिशय नम्रपणे नमुद करतो.

सातारा जिल्ह्यातील पाडेगांव येथील अतिशय प्रतिष्ठेच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख अर्थात ‘ऊस विशेषज्ञ, महाराष्ट्र राज्य’ म्हणुनही कार्य करण्याची मला संधी मिळाली. आपल्या विद्यापीठाच्या ‘कृषी तंत्रज्ञान माहिती प्रसार केंद्राचा प्रमुख’ (Head, ATIC) म्हणुनही अनेक वर्षे मी जबाबदारीचं नेतृत्त्व केलं. या जबाबदारी आणि संधीमुळे मला विद्यापीठ केवळ कार्यक्षेत्रातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील इतरही सहस्त्रावधी शेतकऱ्यांशी अधिक गतीनं जोडता आलं आणि मी व्यक्तिशः ही त्यांच्याशी कायमचा जोडलो गेलो, याचंही मला अतिव समाधान आहे.

अलिकडच्या काळात विद्यापीठ परिसरात १५ हुन अधिक शेततळे निर्माण करण्यात विद्यापीठाची २५० एकरहुन अधिक पडिक शेतजमीन लागवड व ओलिताखाली आणण्यात आणि इतरही काही प्रकल्पांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी विद्यापीठास प्राप्त करुन देण्यात मला अल्पस पण महत्त्वपूर्ण योगदान देता आलं याचा आनंद आहे. ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानदान ही कोणत्याही विद्यापीठाची दोन प्रमुख कार्य मानली जातात. या दोन कार्यापैकी ज्ञाननिर्मिती ही संशोधनातुन आणि ज्ञानदान हे अध्यापनातुन होत असतं, याची मला खोलवर समज होती. विद्यार्थी आणि शेतकरी हे कोणत्याही कृषीविद्यापीठाचे खरे केंद्रबिंदू आणि लाभार्थी असतात. म्हणूनच गुणवत्तापूर्ण अध्यापनातून विद्यार्थीसेवा आणि कृषी विस्तार कार्यात लोकशिक्षकाची भूमिका बजावून विद्यापीठाच्या सेवाक्षेत्रातील दहा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांसमवेतच महाराष्ट्रातील इतरही शक्य होईल तेवढ्या शेतक-यांचे कृषी लोकशिक्षण, हे माझं ध्येय राहिलं आहे. प्रशासकीय कामकाजाच्या व्यापात ‘अध्यापनाला आणि शेतकऱ्यांच्या प्रबोधनाला’ मी कधीही ‘गौणत्व’ येऊ दिलं नाही, याचा मल सार्थ अभिमान आहे.

विद्यापीठातील माझ्या या प्रदीर्घ सेवा कालावधीत विद्यापीठाचे सर्व सन्माननीय कुलगूरु, संचालक, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, शिक्षक, कुलसचिव, नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, अधिकारी, कर्मचारी, कामगार, शेतकरी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी या सर्वांचं अनमोल सहकार्य आणि नैतिक पाठबळामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या या पवित्र कर्मभूमित मी यशस्वीपणे कार्य करु शकलो, अशी माझी श्रध्दा आहे. यास्तव मी आपल्या सर्वांप्रती माझी गाढ कृतज्ञता व्यक्त करतो. विद्यापीठाशी एकरुप होवून निष्ठापूर्वक आणि निःस्वार्थपणे सेवा करता आली, याचं संपूर्ण श्रेयही आपलंच आहे.

आजही एका बाबीचा आवर्जुन उल्लेख करायला मला आवडेल. मी १९८९ मध्ये पी.एच.डी झाल्यानंतर सुरुवातीचे दोन-अडीच वर्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि स्वतः बाबासाहेबांनीच स्थापन केलेल्या People’s Education Society च्या छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक ‘मिलिंद विज्ञान महाविद्यालयातही’ अध्यापन कार्य करण्याची मला संघी मिळाली होती. या प्रसंगी मी ‘मिलिंद’च्या परिवर्तनवादी शिक्षणभूमीचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. याच कालावधीत माझ्या पीएच.डी.च्या संशोधन प्रबंधास ‘भारतीय कृषी अनुसंधान संस्था, नवी दिल्ली’ तर्फे सर्वोत्कृष्ट संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या Dr.Bains Memorial Award’ या खूप मानाच्या पुरस्काराचा मी मानकरी ठरलो. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मला जागतिक किर्तीच्या थोर समाजसेविका भारतरत्न मदरतेरेसा यांच्या शुभहस्ते नवी दिल्ली येथे प्राप्त झाला. पुढे मला अनेक पुरस्कार प्राप्त होत गेलेत, हे मी आपणास अतिशय विनयपूर्वक अवगत करु इच्छितो.

मित्रहो, कुटूंब ही नागरीकत्वाची पहिली पाठशाळा असते. माझ्यात जे-जे चांगलं असेल त्याचे संपूर्ण श्रेय माझ्या परिवारातील वडिलधाऱ्यांना जातं आणि माझ्यात जे-जे फारसं चांगलं नसेल, ज्या काही उणिवा असतील त्याचं अपश्रेय माझ्याकडे येतं. माझा जन्म खेडेगावातील एका शेतकरी कुटूंबातला. आजी, काका-काकू, आई-वडील आणि १४ भावंड अशा संयुक्त परिवारात माझं संगोपन आणि जडण-घडण झाल. आमच्या आजी आमच्या कुटूंबाचं दैवत. वयाच्या अवघ्या पंचवीशीतच विधवा झालेल्या. पुढची प्रत्येक पिढी ही मागच्या पिढीच्या खांद्यावर उभं राहून जग पाहत असते. मला जे थोडंफार शिकून इथपर्यंत येता आलं आणि आमच्या कुटूंबानं जी प्रगती केली याचं सगळं श्रेय आमच्या कष्टाळू आजी आणि तितकेच कष्टाळू पण दूरदृष्टीच्या शिक्षणप्रेमी वडिलांना जातं. आमच्या आजी मला भारतातील कोट्यावधी काबडकष्ट करणाऱ्या शेतकरी महिलांच्या एक प्रतिनिधी वाटतात. म्हणुन आमच्या आजींच्या स्मरणार्थ आपल्या विद्यापीठाच्या दरवर्षी होणाऱ्या पदवीप्रदान समारंभात कृषी विद्या विभागातील सर्वाधिक गूण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यास आजीच्या नावाचं सुवर्ण पदक देण्याचा विनंती प्रस्ताव मी विद्यापीठाकडे पाठविला होता. मला आपणास सांगताना विशेष आनंद होतोय की, विद्यापीठाची मा. विद्वत सभा (Academic Council) मा. कार्यकारी परिषद (Executive Council) आणि मा. कुलगूरु यांनी या प्रस्तावास मान्यता देऊन मला उपकृत केले आहे. मी आणि चिमणापूर येथील आमचा समस्त सोळुंके परिवार विद्यापीठाप्रती गाढ कृतज्ञता व्यक्त करतो.

मित्रहो, १९८९ ते २०२४, मिलिंद महाविद्यालय ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ, जन्मभूमी चिमणापूर ते कर्मभूमी राहुरी, खेडेगावातील जिल्हा परिषदेची शाळा ते विदेशातील अभ्यासदौरे, हा संपूर्ण लांब पल्ल्याचा जीवनप्रवास आज या कर्मभूमीतून जड अंतःकरणानं निवृत्त होतांना मनःचक्षु समोर स्पष्टपणे तरळत आहे.

स्वतःची शैक्षणिक कारकिर्द, करिअरची कारकिर्द आणि स्वतःला सिध्द करण्यात वयाची ६२ वर्षे उलटून गेलीत! या सर्व व्यापात आमचं विशाल कुटूंब, शेती, गाव, शिवार, मित्र, नातेवाईक आणि इतर प्रियजन यांच्याकडे दुर्लक्ष झाले, हे मला नाकारता येणार नाही. या उपरही, विशाल अंतःकरणाचे गावाकडील हे सर्व प्रियजन माझ्या या सेवानिवृत्ती सोहळ्यास दुरवरुन येऊन मला माझ्या या कर्मभूतीतून माझ्या जन्मभूमीत सोबत घेऊन जाण्यासाठी आलेत, त्याबद्द्ल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो.

मित्रहो, विद्यापीठाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी आणि आपल्या सर्वांच्या हितासाठी आपला सर्वांचा माझ् यावरील अधिकार अबाधित ठेऊन, मी जेथे असेल तेथून प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही देतो. मित्रहो, माझा अर्धा आत्मा माझ्या याच कर्मभूमीत, सेवाभूमीत ठेऊन आणि अर्धा आत्मा व आपल्या सदिच्छांची शिदोरी सोबत घेऊन मी जन्मभूमीकडे निघतोय अलविदा ! गुड बाय!
धन्यवाद !

आपला नम्र
प्रा. डॉ. आनंद सोळंके, मु. चिमणापुर, ता. कन्नड, जि.छ. संभाजीनगर

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button