पश्चिम महाराष्ट्र

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रभारी भाषा संचालकपदी प्रा.डॉ. वाघमारे यांची नियुक्ती 

सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रभारी भाषा संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डी.टी.शिर्के यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलसचिव प्रा.डॉ. विजय कुंभार व विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता उपस्थित होते. नियुक्तीनंतर महाविद्यालयात प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, यशवंत मनोहर, किशोर बेडकिहाळ, लेखक बाळासाहेब कांबळे, कुंदा लोखंडे, सतीश मस्के, डॉ.प्रशांत गायकवाड, निलेश महिगावकर, डॉ.विश्वनाथ शिंदे, डॉ.सुधाकर शेलार, डॉ.बाबुराव उपाध्ये, डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ.दत्ता पाटील, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अनेक सदस्य, प्रा.चंद्रकांत जडगे, रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक, शाहीर शाम रोकडे, समता प्रतिष्ठान मळोलीचे सदस्य, तसेच मराठी विभागातील प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मळोली हे असून त्यांचे महाविद्यालयीन ११ वी ते एम.ए. पर्यंतचे शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झालेले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल, फुंडे, कर्जत, माढा, मंचर, लोणंद, पाचवड येथील महाविद्यालयात त्यांनी मराठी विषयाचे ३३ वर्षे अध्यापन केलेले आहे.

अलीकडेच त्यांचे ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव’ व ‘मी भारतीय’ हे दोन कविता संग्रह प्रसिद्ध झाले असून जवळपास २२ पुरस्कार त्यांच्या कविता संग्रहास मिळालेले आहेत. महाविद्यालयीन वार्षिक नियतकालिकेसह रयत शिक्षण संस्थेच्या रयत शिक्षण पत्रिकेच्या संपादनात देखील काम केलेले आहे. विवेक वाहिनी सारख्या विद्यार्थ्यांना स्वयंविकास करणाऱ्या उपक्रमात त्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. महाविद्यालयात मराठी विभागात नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करून सतत प्रयोगशील राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे.

आधुनिक सम्यक विचारांचा पुरस्कार करीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना प्रेरित केलेले आहे. वक्तृत्वावर त्यांचे प्रेम असून त्यांनी वक्तृत्व कला विकास कार्यशाळेसारखे उपक्रम आयोजित करून भाषा विकासासाठी प्रयत्न केले आहेत. भाषा, साहित्य, संशोधन, उपयोजित लेखन, संपादन यात त्यांना रस असून सतत कार्यमग्न असतात. मराठी भाषा, संस्कृती व आदिवासी बोलीभाषा यांचा अभ्यास व संशोधन करण्यासाठीचे वातावरण तयार करणे, त्याची जोपासना करणे या उद्दिष्टांसाठी भाषा मंडळ काम करते. भाषा मंडळाद्वारे विविध भाषा, संस्कृती, आदिवासी बोली संदर्भाने पदविका कोर्सेस सुरु करणे इत्यादी उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. अनेक मान्यवरांनी विद्यापीठातील भाषा संस्कृतीचे अभ्यास कार्य गतिमान करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button