अहमदनगर

राहुरी येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने सोमवार पासून साखळी उपोषण

राहुरी – आज मराठा समाज बांधवांची बैठक विठ्ठला लॉन्स येथे संपन्न झाली. यावेळी राहुरी तालुक्यातील शेकडो मराठा तरुण उपस्थित होते.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या ४० वर्षांपासून आंदोलने होत आहेत. यात अनेक मराठा तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. परंतु कोणत्याच सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेले नाही. जगात नोंद व्हावे असे लाखोंचे मोर्चे या महाराष्ट्रात निघाले. परंतु आरक्षण मिळालेले नाही.

याच विषयास अनुसरून मराठा संघर्ष योद्ध मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी जि.जालना येथे आमरण उपोषणास सुरवात केलेली आहे. त्यांच्या उपोषणास पाठींबा म्हणून राहुरी तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने राहुरी तहसिल कार्यालयासमोर सोमवार दि.३० ऑक्टोंबर २०२३ पासून सकाळी ११ ते दु.४ वाजेपर्यंत साखळी उपोषण करण्याचे नियोजन करण्याचे मराठा समाज बैठकीत ठरले आहे.

जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राहुरी तालुक्यामध्ये सर्वच राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्याचा ठराव मराठा समाजाकडून करण्यात आला.

या साखळी उपोषणात राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावाला एक दिवस देण्यात येणार आहे. दि.३० पासून सुरु होणाऱ्या साखळी उपोषणास राहुरी तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सकल मराठा समाज, मराठा क्रांती ठोक मोर्चा व मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती राहुरी तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button