आरोग्य

योग्य आहार, व्यायाम व उपचार या त्रिसूत्री चे पालन केल्यास मधुमेहातून मुक्ती – डॉ. गोपाळ बहुरूपी

माऊली सभागृह येथे आयोजित मोफत मधुमेह मार्गदर्शन शिबिराचे दिपप्रज्वलन करून उद्घाटन करतांना डॉ. गोपाळ बहुरूपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. चेतना बहुरूपी, डॉ. शिल्पा बोरकर आदी मान्यवर ( छाया : ऋषिकेश राऊत )
नगर : योग्य तपासण्या व उपचार, संतुलित आहार व वेळेवर जेवण, व्यायाम या त्रिसूत्री चे व्यवस्थित पालन केले तर आपण मधुमेहाला पळवून लावू शकतो, अशी माहिती मधुमेह तज्ञ डॉ. गोपाळ बहुरूपी यांनी दिली. सर्वज्ञ मेडिकल फाउंडेशन, डॉ. गोपाळ बहुरूपी अकॅडमी ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड लर्निंग एक्सलेन्स व न्युक्लिअस हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने माऊली सभागृह येथे आयोजित मोफत मधुमेह मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी डॉ. सुधीर बोरकर, डॉ. चेतना बहुरूपी, डॉ. शिल्पा बोरकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
मधुमेहावर मार्गदर्शन करतांना डॉ. गोपाळ बहुरूपी म्हणाले की, भारतात दिवसेंदिवस मधुमेह आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मधुमेह या आजारामुळे अर्धांगवायू, अंधत्व, हृदय विकाराचा झटका, रक्त वाहिन्यांचे आजार, पायांची जळजळ, पायांना जखमा होणे यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. मधुमेहावरील उपचाराचा खर्च आपल्या अवाक्या बाहेर जातो यामुळे आपल्याला हा आजारच होऊ नये व झालाच तर काय काळजी घ्यावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जेवणाच्या चुकीच्या सवयी, ताण तणाव व व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह होऊ शकतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे म्हणजे मधुमेह होणे होय. मधुमेह झाल्यामुळे स्वादुपिंडात इंशुलिन तयार होत नाही. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णांना इंशुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते. मधुमेही रुग्णांनी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, व रात्रीचे जेवण असे दिवसातून ३ वेळा अन्न सेवन करावे. आपल्या जेवणात भरपूर हिरव्या पालेभाज्या, कंदमुळे, सफरचंद, संत्री, मोसंबी, टरबूज, खरबूज, पेरू,डाळिंब, सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, दूध, दही, ताक असे पदार्थ खावीत. शरीरातील चरबी व रक्तदाब नियंत्रणात ठेवावे. 
साखर, गूळ, मध, दुधावरची साय, तूप, त्याच बरोबर मधुमेह झालेल्या रुग्णांनी केळी, चिक्कू, द्राक्षे, सिताफळ, आंबा ही फळे अजिबात खाऊ नयेत. सकाळी ६ ते ७ यावेळेत चालणे, धावणे, योगासने, सूर्यनमस्कार, पोहणे, सायकलिंग यांसारखे आपल्याला झेपतील असा अर्धा तास व्यायाम करावा. दिवस भरात किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन च्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात. थकवा येणे, दम लागणे, हाता पायानां सुज येणे, रात्री अनेकदा लघवीला जावे लागणे, भूक कमी लागणे व अंगाला खाज येणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब मधुमेह तज्ञांचा सल्ला घ्यावा, असे त्यांनी सांगितले. डॉ. चेतना बहुरूपी यांनी लहान मुलांमध्ये होणाऱ्या मधुमेहाविषयी मार्गदर्शन केले. अशक्तपणा, सर्दी, खोकला होणे, चिडचिड होणे, उलटी, जुलाब होणे, पोट दुखणे, शरीरावर झालेल्या जखमा लवकर न भरणे, चक्कर येणे ही लक्षणे लहान मुलांना मधुमेह झाल्यानंतर आढळून येतात. अशा वेळी मधू मेह तज्ञांचा सल्ला घेऊन इन्सुलिन सुरू करावे. व्यायाम, झोप, जेवण याची काळजी घ्यावी. याबाबत दोन्ही तज्ञ डॉक्टरांनी स्लाईड शो द्वारे रुग्णांना सहज समजेल अशा शब्दात मार्गदर्शन केले. 
यावेळी शांता रणशिंग, डॉ. कडूस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी योग्य उपचार, संतुलित आहार, व्यायाम यामुळे मधुमेह नियंत्रित ठेवणाऱ्या रुग्णांचा सन्मानचिन्ह, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी मधुमेहा विषयी जनजागृती करणार माहितीपट दाखविण्यात आला. डॉ. गोपाळ बहुरूपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. चेतना बहुरूपी, डॉ. शिल्पा बोरकर, शांता रनसिंग आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन झाले. प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते हर्षल आगळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. डॉ. सुधीर बोरकर यांनी आभार मानले.
यावेळी प्रहार करियर अकॅडमीचे परदेशी, संजय नागरगोजे, ॲड. सागर पादिर, डॉ. कडुस, प्रवीण साबळे, राहुल पाटोळे, अतुल जवणे, सुशील गायकवाड व आढळगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने डॉ. बहुरूपी यांचा सत्कार करण्यात आला. मधुमेह रुग्णांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे डॉ. गोपाळ बहुरूपी व डॉ. चेतना बहुरूपी यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्युक्लिअस हॉस्पिटलच्या पी.आर. ओ. टीम व इतर स्टाफने परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button