आरोग्य

आरोग्यासाठी आहार, स्वच्छता, व्यायाम ह्या त्रिसूत्रांची गरज – डॉ. शेख

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : दिव्यांग व्यक्ती करिता जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत असते. आज मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी करिता विशेष तपासणी करत असतांना विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार, स्वच्छता व व्यायाम या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक असल्याचा सल्ला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.तौफिक शेख यांनी दिला.

ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर व मूकबधिर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी व ब्लँकेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मूक बधिर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक रामदास रासकर होते. कार्यक्रमासाठी वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ. शेख म्हणाले की, आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य सदृढ राहते. आपल्या शरीराची स्वच्छता अत्यंत आवश्यक असते. नियमित ब्रश करणे, अंघोळ करणे, हात धुतांना सहा प्रकारे धुणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नियमितपणे व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आज किशोरवयीन मुलींना अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासले आहे. लहानपणी रक्तक्षय जडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्याचा परिणाम भविष्यात गर्भधारणा करिता अनेक अडचणी निर्माण होतात. मूकबधिर विद्यालयातील वैद्यकीय सामाजिक अधिकारी संजय साळवे यांचे दिव्यांग क्षेत्रात अतिशय मौल्यवान कार्य सुरू आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.

डॉ.तौफिक शेख यांनी आपल्या स्वतःच्या कमाईतून मुलांना ब्लँकेट वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक दिपक तरकासे यांनी केले तर आभार अतुल साळुंके यांनी मानले. शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष शिक्षिका सौ.कौशल्या जाधव, चंद्रकांत सांगळे, वसतिगृह अधिक्षक कैलास बनकर, सौ.अरूणा तुरुकमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button