राजकीय

१३० ग्रामपंचायत सदस्य मतदानास मुकणार ?

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकी बरोबरच श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक येत्या ३० एप्रिल रोजी होणार आहे. तसा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दोन दिवसानंतर म्हणजेच २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. असे असताना हा निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे मागणी करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, जाहीर करण्यात आलेला निवडणूक कार्यक्रम बेकायदेशीर असून प्रशासक असलेल्या १० ग्रामपंचायतींच्या सदस्यांना या मतदान प्रक्रियेस मुकावे लागण्याची शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. तालुक्यातील माळवाडगाव येथील रहिवासी प्रदीप आसने यांनी ही तक्रार केली आहे. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपला असल्याने तेथे प्रशासकराज आहे. त्यामुळे सदस्य मंडळ अस्तित्वात नाही. जुन्या सदस्यांना मताधिकार नसणार. कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना मताधिकार देने बेकायदेशीर ठरेल. त्यामुळे सुमारे १३० सदस्यांना यातून वगळले जाण्याची शक्यता आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील सोसायटी, ग्रामपंचायत हमाल मापाडी आणि व्यापारी मतदार संघाच्या यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रदीप आसने यांनी सदर बाबतीत श्रीरामपूर पंचायत समिती कार्यालय येथून तालुक्यातील प्रशासक आलेल्या ग्रामपंचायतीची माहिती घेऊन सदर निवडणूक कार्यक्रम हा बेकायदेशीर असल्याबाबतची तक्रार राज्य निवडणूक सहकारी प्राधिकरणाकडे सादर केली. त्यामुळे राज्य निवडणूक प्राधिकरणाला जाग आली असून त्यानंतर त्यांनी सदर मतदार यादीमधून प्रशासक असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. त्यामुळे सदर निवडणुकीत प्रशासक असलेल्या ग्रामपंचायतीवरील सदस्य मतदानापासून वंचित राहणार असल्याचे दिसून येत आहे.

श्रीरामपूर प्रमाणे जिल्ह्यातील व राज्यातील इतर कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समितीची स्थिती काय आहे. कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना वगळण्याचा निर्णय झाल्यास अनेक ग्रामपंचायती व तेथील नागरिक या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. ते संविधानास धरून नाही त्यामुळे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरनाच्या निर्णयाकडे श्रीरामपूरसह राज्याचे लक्ष लागले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button