साहित्य व संस्कृती

पुस्तके ही जीवन प्रगतीची, ज्ञान संस्कृतीची महातीर्थे – डॉ.रामचंद्र जाधव

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आज वाचन आणि लेखन हीच आत्मसमाधान मिळवून देणारी जीवनसंजीवनी मानली पाहिजे. पुस्तके ही मनाला निर्मळ बनवितात, शक्ती आणि भक्ती चे बळ देतात. पुस्तके ही जीवन प्रगतीची आणि ज्ञान संस्कृतीची महातीर्थे असतात, ते लक्षात घेऊन वाचन संस्कृती वाढविली पाहिजे असे मत माजी शिक्षणाधिकारी तथा लेखक डॉ. रामचंद्र नामदेवराव जाधव यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर येथील मार्केट यार्ड परिसरातील शिवाजीनगर भागातील शेळके सभागृहात वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्यावर आधारित ‘पासष्टी’ दीर्घचरित्रात्मक कवितासंग्रह लिहिला, तो साकारशील आहे तसेच विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे सचिव सुवदेव सुकळे लिखित ‘देशहितवादी’ व ‘समर्पित प्रकाशयात्री’ या पुस्तकाच्या परिसंवादात डॉ. रामचंद्र जाधव बोलत होते. डॉ उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. डॉ. रामचंद्र जाधव यांनी गुरुवर्य माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांचा सत्कार केला. स्नेहपरिवार ग्रुपतर्फे प्राचार्य शेळके यांनी डॉ. रामचंद्र जाधव यांच्या ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या आत्मचरित्र निर्मितीबद्दल डॉ जाधव यांचा शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार केला.

यावेळी डॉ.रामचंद्र जाधव यांनी आपल्या शिक्षण आणि जीवनातील आठवणी सांगितल्या. आई सुमन आणि वडील नामदेवराव जाधव टिळकनगर साखर कारखाना येथे कार्यरत होते. कॉमर्स कॉलेज व बोरावके कॉलेजमध्ये शिक्षण घेताना कमवा व शिका योजनेत काम केले. गरिबीत ज्ञानलालसा होती. डॉ.उपाध्ये यांच्याबरोबर सतत राहिल्यामुळे विद्यार्थी दशेत अनेक पुस्तके वाचली. एकत्र राहिलो, उपासमार आणि दुर्लक्षित जीवन जगलो. पण अभ्यास केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श समोर ठेवला.

प्राचार्य टी. ई. शेळके हे आदर्श अर्थशास्त्र प्राध्यापक भेटले म्हणून त्या विषयात गती मिळाली. सुखदेव सुकळे यांनी कार्यालयात मनापासून मदत केली. डॉ. बाबुराव उपाध्ये हे निराधार होते पण मनापासून अभ्यास व कष्ट करीत असत. त्यांचे वाचन, लेखनाचे संस्कार मनावर झाले. परिवर्तन चळवळीत समाजसेवेचे कार्य केले. झोपडपट्टीतील, हॉटेलातील मुलांना शिकविले. कष्टाची भाकर केंद्रात काम केले. आता चांदवड येथे शिक्षण संस्था आहे. नाशिक, श्रीरामपूर येथे बराच काळ वास्तव्य करतो. पुस्तके आणि लेखन हे माझे आवडते छंद आहेत. त्यामुळेच डॉ. उपाध्ये यांच्यावर पुंडलिक गवंडी यांनी ‘पासष्टी’ काव्यसंग्रह लिहिला हे विशेष कौतुकास्पद आहे. सुकळे यांचे’ देशहितवादी व समर्पित प्रकाशयात्री पुस्तके लिहिली ती वाचनीय असल्याचे सांगून लेखकाचा सन्मान केला.

प्राचार्य शेळके आपल्या मनोगतात सांगितले की,डॉ. रामचंद्र जाधव, डॉ. उपाध्ये यांनी खूप कष्टातून शिक्षण घेतले, त्यांच्या या जीवन संघर्षाचा आदर्श आजच्या पिढीने जपला पाहिजे असे सांगून रयत शिक्षण संस्था ही संस्कार आणि ज्ञानाची प्रयोगशाळा आहे, ती कर्मवीरांच्या घामातून आणि रयतनिष्ठ सेवकांच्या ज्ञानशील योगदानामुळे लोकप्रिय झाली असे सांगितले. यावेळी देवेंद्र जाधव, सिध्दार्य जाधव आदींनी नियोजनात भाग घेतला. डॉ. उपाध्ये यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button