धार्मिक

मांजरी- पानेगाव येथील ग्रामदैवत चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव

राहुरी : मांजरी, पानेगाव चे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रगिरी महाराजांचा यात्रा उत्सव चैत्र पौर्णिमेला सुरू होतो आणि तीन दिवस चालु असतो. यात्रेच्या दिवशी पाहटे गंगा नदीवरून आणलेल्या कावडीने नवयुवक जलाभिषेक करतात. जलाभिषेकाचा पहिला मान गावातील तेली समाजाला असून आंबील आरती मान पानेगावचे जंगले यांना आहे.

पूर्वीची आख्यायिका अशी आहे की, मुळा नदीच्या काठावर चंद्रगिरी महाराज भक्ताच्या स्वप्नात जाऊन बोलले की, मी नदीच्या काठावर आहे, मला मामा भाषेची बैल जोडी मला इथून घेऊन जा. दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेला चंद्रगिरी महाराजांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मांजरी या ठिकाणी करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी उत्सव साजरा करण्यात येत असतो.

यात्रेच्या दिवशी या ठिकाणी जिल्ह्यातून तसेच अनेक ठिकाणांहून नवसपूर्तीसाठी भाविक भक्तांची गर्दी झालेली दिसते. नवसपूर्तीसाठी येथे गुळाची शेरणी वाटप केली जात असते. यात्रेच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी रथावरुन मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीच्या वेळेस पानेगाव, मांजरी या दोन्ही गावच्या बाजूने मुळा नदी तटावर फटाक्यांची आतषबाजी पाहावयास मिळते. आतषबाजी पाहण्यासाठी येथील परिसरातील लाखो भाविक येथे जमा होत असतात.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगामा होतो. कुस्त्यांच्या हंगाम्यासाठी जिल्ह्यातून तसेच राज्यातून नामवंत मल्ल येथे येत असतात. तसेच तिसऱ्या दिवशी म्हणजे यात्रेच्या शेवटच्या दिवशी महिलांची खरेदीसाठी मोठी गर्दी झालेली असते. यावेळी पोलिस व पोलिस मित्र तसेच गावातील यात्रा कमिटीकडून महिलांना तसेच इतरांना त्रास होऊ नये म्हणून सुरक्षेची काळजी घेतली जाते.

मांजरी, पानेगाव या दोन्ही गावांमध्ये कुठल्याही प्रकारे छत्री, दुमजली इमारत तसेच पलंग गाधीचा वापर केला जात नाही. यागोष्टी चंद्रगिरी महाराजांना चालत नाही, अशा श्रद्धेपोटी गावांमध्ये वरील गोष्टींचा वापर केला जात नाही.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button