धार्मिक

प्रभू येशू, पवित्र मरिया, व मदर तेरेसा यांचा आदर्श जीवनात घ्यावा – महागुरुस्वामी अम्ब्रोस रिबेलो

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव येथे मतमाउली यात्रा शुभारंभानंतर दुसऱ्या दिवशी नोव्हेनाच्या ”देवाच्या योजनेतील तारणदायीत्वाची माता” या विषयावर महागुरुस्वामी अम्ब्रोस रिबेलो यांनी प्रतिपादन केले की, आज माउलीच्या गौरवासाठी व तिच्या जीवनावर मनन चिंतन करणार आहोत. आजचा दिवस फार शुभ व आनंदाचा आहे. साजरा करण्यासारखा आहे. त्यासाठी देवाला धन्यवाद देत आहे.

आज देशभर शिक्षक दिन साजरा होत आहे. आजच्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर तीन व्यक्ती उभ्या राहतात. पहिली व्यक्ती आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्यानंतर माता मरिया, आणि तिसरी जगभर प्रसिद्ध असलेली व्यक्ती म्हणजे मदर तेरेसा. येशू ख्रिस्त हे खरे शिक्षक होते. तो अधिकारवाणीने लोकांना शिकवीत होता आणि त्याच्या शिक्षणावरून लोक थक्क व्हायचे. कारण लोकांना अनेक दाखले, उदाहरण देऊन वेगवेगळ्या प्रसंगी लोकांना एकत्र करून शिकवत होता. देवराज्याची ओळख करून देत होता. आपल्या कॅथोलिक लोकांसाठी आदर्श शिक्षक म्हणून येशू ख्रिस्त डोळ्यासमोर उभा राहत होता. त्याची माता मरियाने त्याला लहानाचे मोठे केले. येशूला दोन स्वभाव ते म्हणजे मानवी व दैवी. मानवी दृष्टीकोनातून पवित्र मरीयेने त्याचे संगोपन केले. बालपणापासून शिकवले. त्याला ज्ञानी बनविले, भरभक्कम पायावर उभे केले. अगदी बारा वर्षाचा येशू असताना जेरुसलेमच्या मंदिरात हरवलेला होता. तो ज्ञानी लोकांबरोबर वाद करून प्रश्न विचारीत होता. तो त्यांच्या प्रश्नांची सडेतोड उत्तरे देत होता. त्याचे शिक्षण व ज्ञान पाहून ते थक्क झाले. त्या ज्ञानाला पवित्र मरीयेने खतपाणी घातले. बेथलेहेम पासून कालवरी टेकडीपर्यंत तिने त्याला साथसंगत दिली. व त्याच्या ज्ञानात भर टाकून त्याला एक आदर्श लेकरू म्हणून सांभाळले.

तिसरी व्यक्ती ज्याची आज पुण्यतिथी साजरी करतो ती मदर तेरेसा. अगदी कोवळ्या वयामध्ये १७ ते १८ व्या वर्षी कलकत्ता येथून प्रवेश केला व शिक्षिका म्हणून काही काळ गाजवला. संत मेरी कोन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका होत्या. भूगोल व इतिहास हा त्यांचा विषय होता. त्या धर्मशास्त्र देखील गोरगरीबांना शिकवीत असे. लोकांना ज्ञानी बनविले व आपली छाप पाडली. प्रभू येशूची शिकवण सेवा व प्रेम अगदी कृतीत उतरून गोरगरिबांची सेवा केली. जगात आज अजरामर झाली. आज मदर तेरेसा यांचा सन्मान करीत आहोत. या तिन्ही शिक्षकांचे कर्तव्य लक्षात घेऊन आज जगातल्या सर्व शिक्षकांनी त्यांचेकडे आदराने पाहावे व त्यांच्या जीवनातून अतिउत्तम शिक्षक कसे बनावे, दिनदुबळ्यांची सेवा कशी करावी, देवराज्याची ओळख कशी करून द्यावी. आज मतमाउलीची मध्यस्थी या ठिकाणी आपण मागू. तिचा आशीर्वाद मागू. या व सर्व शिक्षकांना आजच्या दिवशी मी हार्दिक शुभेच्छा देऊन माउलीच्या आधीन त्यांना सोपवितो.

आजच्या या नोव्हेनात बिशप अम्ब्रोस रिबेलो समवेत हरिगाव प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारिओ, फा.फ्रान्सिस ओहोळ, फा. संतान रॉड्रीग्ज सहभागी होते. यावेळी सर्व आजी माजी शिक्षकांचा सन्मान महागुरु स्वामी यांनी केला. दि ६ सप्टेंबर रोजी फा.आनंद गायकवाड यांचे दिनाच्या कैवारिणी या विषयावर प्रवचन झाले. दि ७ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर फा. प्रकाश भालेराव यांचे धन्य माता-पवित्र मरिया” या विषयावर प्रवचन होईल. त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारिओ यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button