सामाजिक

देवळाली प्रवरा येथे दिव्यांग मार्गदर्शन शिबिर व ‘माणुसकीची भिंत’ या उपक्रमाची सुरुवात

राहुरी – प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका सल्लागार सलीमभाई शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिव्यांग मार्गदर्शन मेळावा व ‘माणुसकीचे भिंत’ या उपक्रमांचे उद्घाटन तसेच 26 दिव्यांग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हाध्यक्ष ॲड.लक्ष्मणराव पोकळे हे होते. देवळाली प्रवरा येथील श्री स्वामी समर्थ बाबुराव पाटील महाराज संस्कृतिक भवन येथे भव्य दिव्यांग मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात देवळाली प्रवरा येथील दिव्यांगाना 26 अंत्योदय रेशन कार्ड चे वाटप, व माणुसकीची भिंत उपक्रमाचा शुभारंभ देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगरसेवक अजित चव्हाण, मुख्याधिकारी अजित निकत, ह.भ.प बाळकृष्ण खांदे महाराज, ह.भ.प नानासाहेब महाराज शिंदे, ह.भ.प जालिंदर साळुंके महाराज, जिल्हा सचिव हमीदभाई शेख, प्रहार श्रमिक संघटनेचे बाळासाहेब कराळे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत मधुकर घाडगे म्हणाले की, दिव्यांग शक्ति सेवा संस्थेच्या अंतर्गत माणुसकीची भिंत हा उपक्रम दिव्यांगासाठी खूप छान उपक्रम आहे. यात आपल्याकडील असणारे कॅलिबर कुबडी, तीन चाकी सायकल, व्हीलचेअर वाकर, कानाचे मशीन असे दिव्यांगाचे साहित्य ते आम्हाला द्या, आम्ही ते गरजवंत दिव्यांगांना मोफत देऊ, असा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. आपल्याकडे शिल्लक असणारे दिव्यांगाचे साहित्य मिनी आयटीआय कॉलेज रोड, राहुरी येथे जमा करावे असे आवाहन तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांनी केले.

जिल्हाअध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव पोकळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, तालुक्यात जास्तीत जास्त दिव्यांगाचे स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्यात यावे. मुख्याधिकारी अजित निकत यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, दिव्यांगांना कोणतीही अडचण असू द्या आमचे सहकार्य नेहमी राहील. दिव्यांग भवनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल. यावेळी सलीमभाई शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या मातोश्री जमीला शेख यांचा राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी नगर शहराध्यक्ष संदेश रपाडीया, नगर तालुकाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, संजय पुंड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सचिन क्षिरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्याक्रमास राहुरी तालुकाध्यक्ष योगेश लबडे, उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका महिला अध्यक्षा सौ.छायाताई हारदे, राहुरी शहराध्यक्ष हरेल मॅडम, तालुका सचिव दत्तात्रय खेमनर, तालुका संघटक भास्कर दरंदले, आनिल मोरे, राजेंद्र सोनवणे, सुखदेव कीर्तने, संदिप बोरसे, बाबुराव शिंदे, आदिनाथ दवने महाराज, सुरेश दाणवे, बाबासाहेब मुसळे, भरत आढाव, शशिकांत कुऱ्हे, सोमनाथ काळे, विष्णू ठोसर आदिंची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button