कृषी

भाजीपाला दराची घसरण सुरूच, बळीराजा आर्थिक संकटात…!

 कृषीप्रधान अर्थव्यवस्थेत शेतकरी आजही आर्थिक दृष्टीने सक्षम नाही ही वस्तुस्थिती आहे. असं असलं तरी कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी उभा असलेला शेतकरी मात्र आज खुप मोठया अडचणीत सापडला आहे. मागील जवळपास पंधरा दिवसांपासून टोमॅटो, वालवड, घेवडा, चवळी, कोथिंबीर, भोपळा तसेच इतर जवळपास सर्वच भाजीपाल्याचे भाव खूपच कमी झालेले आहेत. इतके कमी कि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघू शकणार नाही अशी परिस्थिती ओढावली आहे.
त्यातच या वर्षी खराब हवामान, युरियाची टंचाई, खते व औषधं यांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती, पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती त्यामुळे माल वाहतूक व शेतीच्या मशागतीचा वाढलेला खर्च, वाढलेली मजुरी, कधी लॉकडाऊनचा बसलेला फटका तर आता शेतमालाचे पडलेले बाजारभाव यामुळे आज खऱ्या अर्थाने आर्थिक दृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता मालाची आवक वाढली असं व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. परंतु कमीत कमी जनाची नाही तर मनाची या म्हणीप्रमाणे व्यापारी व ग्राहकांनी बळीराजाने पोटच्या पोराप्रमाणे पिकविलेला शेतमाल मार्केटला येईपर्यंत काय काय हाल अपेष्ठा सहन केल्या आहेत त्याचा विचार करून शेतमाल खरेदी केला पाहिजे. कारण ही परिस्थिती नेहमी अशीच राहणार नाही. प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच…! ज्या दिवशी बळीराजाच्या सहनशीलतेचा उद्रेक होईल, ज्या दिवशी तो थांबून घेईल त्या दिवशी सर्वांच्या पोटाला लॉकडाऊन असेल हा विचार समाज्यातील प्रत्येक घटकांनी केला पाहिजे.
शेतकरी हा एकमेव घटक स्वयंपोशी व अन्नदाता असून तो इतरांचीही भूक भागवतो हे समाजातील परपोशी घटकांनी लक्षात घ्यावं. अख्या जगाची खळगी भरणारा बळीराजा आज मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करतो आहे ही वस्तुस्थिती आहे. ज्या दिवशी त्याच्या सहनशीलतेचा अंत होईल त्या दिवशी व्यवस्था बदललेली असेल. तो ऐतिहासिक दिवस नक्की कधी येईल हे सांगता येणार नसलं तरी साने गुरुजींच्या आता उठवू सारे रान…! आता पेटूवू सारे रान…! शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण…! या काव्यपंक्तीतुन दिलेला संदेश तो दिवस उजाडण्यासाठी पुरेसा आहे. अट फक्त एकच आहे एकजुटीची वज्रमूठ बनवून…!
          बाळासाहेब भोर 
युवक अध्यक्ष,अ.भा.क्रांतीसेना, संगमनेर.

Related Articles

Back to top button