अहमदनगर
पवित्र मारीयेचा नम्रता गुण कुटुंबात असावा – फा.विल्सन गायकवाड
श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे) : पवित्र मारीयेचा नम्रता गुण हा प्रत्येक कुटुंबामध्ये असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन फा.विल्सन गायकवाड यांनी संत तेरेजा मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रापूर्व सातव्या शनिवार नोव्हेनाप्रसंगी केले. ते पुढे म्हणाले की पवित्र मारिया ही आदर्श गृहिणी होती. कारण तिने तिचे कुटुंब चांगल्या रीतीने सांभाळले होते. तिच्या मुलाची काळजी तिने घरातील सर्व कामे सांभाळून घेतलेली होती. तिने देवावरची नितांत असलेली श्रद्धा व भक्ती कधी कमी पडू दिली नाही. म्हणून आपण त्या आदर्श गृहिणीकडून बोध व आदर्श घेतला पाहिजे व दैनंदिन कुटुंबामध्ये ठेवला पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचे बाळकडू पाजले आहे. लहान असताना त्याला देवाची ओळख करून दिली आहे. अशी ती पवित्र मारिया आज आम्हाला एखाद्या आदर्श गृहिणी म्हणून मिळाली आहे. म्हणून तिचा आदर्श आपल्या कुटुंबात घेतला पाहिजे. आपण आदर्श व भक्तिमय जीवन जगले पाहिजे. तिच्यासारखे नम्रतेचे व श्रद्धेचे जीवन जगले पाहिजे. हेच आपल्याला आज पवित्र मारीयेकडून आज शिकायचे आहे. आदी सविस्तर प.मारीयेच्या जीवनाची महती सांगितली. या नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे, डॉमनिक रोझारिओ, रिचर्ड अंतोनी आदी सहभागी झाले होते. या नोव्हेनाचे शासकीय आदेश पाळून यु ट्यूब प्रसारमाध्यमाने भाविकांना घरबसल्या लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले. येत्या २८ ऑगस्ट रोजी रे फा. ज्यो गायकवाड श्रीरामपूर यांचे नोव्हेनाप्रसंगी प्रवचन होणार आहे.