कृषी

महापुरुषांचे विचार अंगीकृत करणे अत्यावश्यक आहे – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी | जावेद शेख : महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे समता, बंधुता व न्याय या तत्त्वांवर कार्य करणारे समाजसुधारक तसेच बुद्धिवादाला आणि तर्कबुद्धीला प्राधान्य देणारे श्रेष्ठ शिक्षणतज्ञ होते. हंटर कमिशनच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी शाळा सुरू केली. स्वतःच्या पत्नीला शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचा त्यांनी पाया रचला. त्यातूनच निर्माण झालेली आजची कर्तबगार स्त्री ही सर्व क्षेत्रांमध्ये यश संपादन करीत आहे.

स्त्रियांच्या प्रगतीसाठी सती प्रथेचे निर्मूलन, विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न, अनौरस संततीसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची निर्मिती असे प्रवाहाच्या विरुध्द जाऊन क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय त्यांनी घेतले. 19 व्या शतकातील परिस्थिती लक्षात घेता ब्रिटीश सत्तेच्या विरोधात न जाता सामाजिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपले जीवन खर्च केले. आजच्या काळातील महापुरुषांच्या जयंती तथा पुण्यतिथी साजर्या करण्याच्या पद्धती व स्वरूप बदलणे गरजेचे असून महापुरुषांचे विचार अंगीकृत करणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

कृषी महाविद्यालय, पुणे येथे महात्मा ज्योतीबा फुले यांची 197 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. या प्रसंगी उत्पादन शुल्क विभाग, पुणेचे सहायक अधीक्षक उत्तमराव शिंदे, कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, सहयोगी संशोधन संचालक डॉ. रवींद्र बनसोड, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अरुण कांबळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पाटील पुढे म्हणाले की महात्मा फुले यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांच्या कृषिविषयक कार्यात प्रामुख्याने मृद व जलसंधारणाची कामे, धरणांची निर्मिती, विहिर खोडणे इत्यादी सोबत डेक्कन एग्रीकल्चरल रिलीफ फंड कायदा पास केला. थॉमस पेन, छत्रपती शिवाजी महाराज, जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या विचारांचा प्रभाव फुल्यांच्या जीवनात दिसून येतो. ते श्रेष्ठ साहित्यिक होते, त्यांनी लिहिलेल्या गुलामगिरी, शेतकर्यांचा आसूड या ग्रंथातून त्यांची शेतकर्यांच्या प्रती असलेली संवेदनशीलता दिसून येते. अगदी सध्याच्या परिस्थितीतील कृषी क्षेत्रातील आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य महात्मा फुले यांच्या विचारांमध्ये दिसून येते. म्हणून महात्मा फुले यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि कर्तृत्वाच्या कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना महात्मा फुले यांच्या विचारांप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने वसुधा फडतरे, राहुल काळे, प्रथमेश चांदगुडे, अक्षदा गायकवाड, आशुतोष महाडिक आणि वेदांत पुंड या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी महात्मा फुले यांच्या विविध पैलूंविषयी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी महात्मा फुले यांचे कार्य सद्यस्थितीत सुद्धा खूप मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सानिका कोकरे यांनी केले तर आभार कु. अनुराधा पागीरे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button