ठळक बातम्या

धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांचे उपोषण मागे

नगर : धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांची दि. 26 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असल्याची ग्वाही दिली. त्यानंतर अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन श्री रूपनर व श्री बंडगर यांनी उपोषण सोडले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित होते.

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात 21 सप्टेंबर रोजी यशवंत सेनेच्या प्रतिनिधीसमवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विस्तृत बैठक झाली. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी न्याय असून शासनाने एकमताने या मागणीला पाठिंबा दिला. आरक्षणाबाबत काही तांत्रिक अडचणी असून काही बाबी न्याय प्रविष्ठ आहेत. त्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत तांत्रिक अडचणींची पन्नास दिवसांमध्ये सोडवणूक करण्यासाठी शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आंदोलनादरम्यान समाज बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. तसेच आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येईल. धनगर समाजासाठी असलेल्या विविध योजना, सोयी-सवलतींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही मंत्री श्री महाजन यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीला मान देत गेल्या 20 दिवसांपासुन सुरू असलेले उपोषण सोडले आहे. धनगर समाजाला शाश्वत आरक्षण देण्यासाठी शासन अत्यंत सकारात्मक असून सर्व समाज बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button