अहमदनगर

अनिल विधाटे यांचा राहुरी येथे अविस्मरणीय सत्कार सोहळा

राहुरी : ब्रम्हाकुमारीज या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने दादी प्रकाशमणि हॉल राहुरी येथे कलाकुंज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल विधाटे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, राहुरी कृषी विद्यापीठाचे महानंद माने, शिवरंग उद्योग समूहाचे संस्थापक मयुरराजे वैद्य (बालमटाकळी ता.शेवगांव), राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश निमसे, राहुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ठोंबरे, राहुरी ब्रह्मकुमारीज शाखेच्या संचालिका नंदा दिदी व राहुरी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील केंद्रप्रमुख थोरात, श्रीमती विद्या भागवत मॅडम, मुख्याध्यापक इंदुमती देवरे मॅडम तसेच शिक्षक बांधव उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे विधाटे सरांना शिकविणाऱ्या त्यांच्या प्राथमिक शिक्षिका संजीवनी उत्तमराव जोशी मॅडम उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ईश्वरीय स्मृती गीताने करण्यात आली. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी चालू शैक्षणिक घडामोडींवर भाष्य करून विधाटे सरांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला, ही राहुरी तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे हे  

आपल्या भाषणातून नमुद केले. भगवान बाबा मल्टीस्टेट चे चेअरमन, युवा उद्योजक मयूरराजे वैद्य यांनी आपल्या भाषणातून विधाटे सरांच्या बीड जिल्ह्यातील कामाचे कौतुक केले. व विधाटे सर व आमच्या वैद्य परिवाराचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्या कारणाने व ब्रह्माकुमारीज विद्यालयात कार्यक्रम होत असल्याने आजारी असुनही आवर्जून कार्यक्रमासाठी आलो हे स्पष्ट केले.

माजी सभापती रवींद्र आढाव यांनी विधाटे सर हे आमच्या मानोरी गावचे रहिवासी असून त्यांना पुरस्कार मिळाल्याने गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे सांगून सरांच्या भावी शैक्षणिक कार्याला शुभेच्छा दिल्या. राहुरी कृषी विद्यापीठाचे जलसंचलन विभागाचे प्रमुख तथा सावित्रीबाई फुले शैक्षणिक संस्थेचे सचिव महानंद माने यांनी सरांच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख थोरात, केंद्रप्रमुख विद्या भागवत मॅडम यांनी ही विधाटे सरांच्या वावरथ व जांभळी या अवघड क्षेत्रातील कामाचे कौतुक केले. बी.के.रविभाई यांनी ब्रह्माकुमारीज या आंतरराष्ट्रीय संस्थेचा परिचय आपल्या भाषणातून करून दिला. शिक्षक नेते रवींद्र आरगडे यांनी विधाटे सरांच्या सुरूवातीच्या वावरथ जांभळी परिसरातील आठवणींना उजाळा देत होडीने प्रवासाच्या आठवणी सांगितल्या.

सत्कारमूर्ती विधाटे सर बोलताना म्हणाले की, मला मिळालेला पुरस्कार हा माझ्या एकट्याचा नसून यामध्ये अनेकांचे सहकार्य, शुभभावना, बाल गोपाळांच्या दुवा आहेत. ब्रह्माकुमारीज परिवारामुळे माझे जीवन घडले. ब्रह्मकुमारीज या आंतरराष्ट्रीय संस्थेचा मी सदस्य असल्याने हा पुरस्कार मी संस्थेला समर्पित करत आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षा ब्रम्हाकुमारीज नंदादीदी यांनी राजयोग मेडिटेशनचे उपस्थितांना महत्त्व सांगून साप्ताहिक राजयोग कोर्स करून आपले जीवन सुखमय बनवावे याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी बी.के.संदीपभाई यांनी ईश्वरीय गीत गाऊन व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button