इपीएस ९५ पेन्शन धारकांच्या दिल्लीतील आंदोलनाला खा. वाकचौरेंसह अनेक खासदारांचा पाठिंबा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस ९५ कर्मचारी पेन्शन योजना अंतर्गत देशातील हजारो पेन्शन धारकांनी नवी दिल्ली येथे जंतर मंतरवर केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांचे नेतृत्वाखाली ध्यानाकर्षण आंदोलन ३१ जुलै रोजी किमान मासिक पेन्शन ७५००/- अधिक महागाई भत्ता मिळावा यासाठी करण्यात आले होते. यावेळी जंतर मंतर येथे आंदोलनात खा. छत्रपती शाहू महाराज, डॉ. शोभा बच्छाव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, कल्याण काळे, भास्करराव भगरे, राजाभाऊ वाजे, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, बंडू जाधव या सर्व खासदारांनी उपस्थित राहून पाठींबा दिला. यावेळी खा. वाकचौरे यांना इपीएस 95 चा शर्ट देण्यात आला.
केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीया यांनी इपीएस ९५ च्या शिष्टमंडळास बोलाविले व हा प्रश्न लवकर सोडविण्यात येईल त्यासाठी पंतप्रधान कटिबद्ध आहेत अशी ग्वाही दिली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे दि. १ व २ ऑगस्ट रोजी होणारे आंदोलन स्थगित झाले. शिष्टमंडळात कमांडर अशोक राउत, राष्ट्रीय सरचिटणीस विरेंद्रसिंग राजावत, मुख्य समन्वयक रमाकांत नरगुंड हे उपस्थित होते.
खा धैर्यशील माने यांनी १ ऑगस्टला बैठक बोलाविली. त्यास १२ खासदार उपस्थित होते. हे प्रश्न पूर्णपणे त्यांनी समजून घेतले व न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले, असे राउत म्हणाले. भविष्य निर्वाह निधी पदाधिकारी सोबतही बैठक झाली. एक ते दोन हजार पर्यंत पेन्शन मिळत असल्याने त्यात प्रपंच चालविणे अवघड आहे. आम्ही सरकारच्या तिजोरीतून पैसा मागवीत नाही तर आमचा जमा झालेल्या रकमेतून पेन्शनवाढ मागतो. जर राजा निर्णय घेत नसेल तर आता लोक हिशोब करतील असा इशारा दिला. देशभरात ७८ लाख पेन्शनधारक आहेत.
महाराष्ट्राचे नेतृत्व पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंगअण्णा जाधव यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यातून महिला अध्यक्ष आशाताई शिंदे, बापूराव बहिरट नेवासा, त्र्यंबकराव देशमुख नगर, भगवंत वाळके श्रोगोंदा, सुलेमान शेख संगमनेर, बबनराव शेटे अकोले, विनायक लोळगे, सुरेश कटारिया, इनामदार, जालिंदर शेलार, बाबासाहेब चेडे यांचेसह ८५ पेन्शनर सहभागी झाले होते.