कृषी

आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर आरोग्यासाठी फायदेशीर – आयुक्त अभिमन्यू काळे

राहुरी विद्यापीठ : गेल्या 50 वर्षात आपल्या भारत देशाची भौतिक प्रगती खुप झाली. परंतु, आरोग्याच्या बाबतीत मात्र आपण कमी पडलो. भारताच्या ग्रामीण भागात 100 किलोचे पोते उचलणारा माणुस आज दिसत नाही. हरित क्रांतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली. परंतु, शरीराच्या सर्वांगीन पोषणाच्या बाबतीत दुर्लक्ष झाल्यामुळे ग्रामीण भागातील शारीरिक क्षमता कमी झाली आहे. याकरीता आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने इट राईट मिलेट मेला या कार्यक्रमाचे आयोजन आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना आयुक्त अभिमन्यू काळे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार होते. याप्रसंगी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त संजय नारागुडे, आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त भुषण मोरे, नाशिक येथील अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त मनीष सानप, नाशिक येथील शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक शशिकांत बोडके, आंतरविद्या शाखेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देविदास खेडकर, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे, राहुरीचे कृषि अधिकारी बापुसाहेब शिंदे व राजेंद्र काळे उपस्थित होते.

अभिमन्यू काळे पुढे म्हणाले की अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी उत्कृष्ट काम करीत असून अन्नाच्या संदर्भातील उद्योग उभारणी करण्यासाठी उत्सुक असलेल्या व्यक्तींना ते नेहमीच मदत करुन प्रोत्साहन देतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पौष्टिक तृणधान्यावरील सादरीकरण केलेल्या कु. ईश्वरी तोडमल व भारुड तसेच पोवाडा सादर करणार्या राजेंद्र काळे यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. शशिकांत बोडके आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व हा आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाचा विषय आहे. पूर्वी आपण गहू हा फक्त सणावाराला खायचो. परंतु, सध्या त्याचे आहारातील प्रमाण वाढल्यामुळे त्यातील ग्लुटेनमुळे उच्चरक्त दाब, डायबेटीस सारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणजे तृणधान्याचे आहारात प्रमाण वाढविणे हाच होय. पौष्टिक तृणधान्याच्या व्यापारात अमर्याद संधी असून ज्वारी, बाजरी पिकविणार्या शेतकर्याला या व्यापारात सर्वात मोठी संधी आहे. मराठी माणसाने या उद्योगामध्ये जास्तीत जास्त संख्येने पुढे येवून उद्योगाची गुढी उभारुन या माध्यमातून भारताचे नांव जगात पुढे न्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले माध्यमीक विद्यालयाची विद्यर्थीनी कु. ईश्वरी तोडमल हिने पौष्टिक तृणधान्यावर सादरीकरण केले. कृषि विभागातील राजेंद्र काळे यांनी तृणधान्यावर पोवाडा व भारुड सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. महानंद माने यांनी केले. यावेळी दि. 12 ते 20 सप्टेंबर, 2023 या कालावधीत अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाने आयोजीत केलेल्या पौष्टिक तृणधान्यावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीके देवून गौरविण्यात आले. यामध्ये मोठ्या गटात कु. अपुर्वा आवारी व लहान गटात कु. सायली कांबळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. कु. ईश्वरी तोडमल हिला यावेळी विशेष पारितोषीक देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी निबंध स्पर्धेचे परिक्षण करणार्या शिक्षकांच्या चमुलाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेटकर यांनी तर आभार भुषण मोरे यांनी मानले. यावेळी पौष्टिक तृणधान्यापासून बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये कृषि विभाग, शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी व राहुरी येथील प्रजापीता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या दालनाचा समावेश होता.

कार्यक्रमासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, नगर येथील अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी, कृषि विभागातील अधिकारी, पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच सावित्रीबाई फुले माध्यमीक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डॉ. महानंद माने व मनीष सानप यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून तर आंतरविद्या शाखेचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देविदास खेडकर यांनी आयोजन सचिव म्हणून काम पाहिले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button