आरोग्य

मातीशी नाळ जोडल्याने जीवनशैली आरोग्यदायी बनेल – कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : आपले आरोग्य चांगले असेल तर आपण सुखी जीवन जगू शकतो. याकरिता आपला आहार आरोग्यदायी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जीवन हे खुप छोटे असून वेळ दवडू नका. रागावर नियंत्रण ठेवा. नेहमी लहान मुलांसारखे रहा. आपली नाळ नेहमी मातीशी जोडलेली राहिली तर आपली जीवनशैली आरोग्यदायी बनेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

राहुरी कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरामधील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना आरोग्य विषयी जागृत करण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या ठिकाणी कार्यरत असलेल्या हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने निरामय आरोग्य या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सेमीनार हॉल येथे करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमासाठी ऑनलाईन उपस्थित राहुन कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. 

याप्रसंगी संशोधन संचालक व कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, या कार्यक्रमासाठी पुणे येथील वक्ते डॉ. जितेंद्र वाळुंज, डॉ. वैष्णवी वाळुंज, इंजि. अविनाश साबळे, कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक व या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. मुकुंद शिंदे, आंतरविद्या शाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा या कार्यक्रमाचे सहसंयोजक डॉ. महानंद माने व कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ शिंदे, ऑनलाईन उपस्थितीत पुणे येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासाळकर, धुळे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर व मुक्ताईनगर येथील कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश गायकवाड उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. सुनिल गोरंटीवार म्हणाले की, कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांचे स्वास्थ तनावमुक्त राहावे या हेतुने या पहिल्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांची ही एक सिरीज् असून 15 दिवसांतून एकदा अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. जितेंद्र वाळुंज यांनी पृथ्वी व जलतत्त्वचा आरोग्य सुधारण्यासाठी वापर करणे, इंजि. अविनाश साबरे यांनी आहार हेच औषध तसेच डॉ.वैष्णवी वाळुंज यांनी विविध आजारांवर ‘योग व निसर्गोपचार पद्धतीने मात कशी कराल’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. मुकुंद शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार डॉ. महानंद माने यांनी मानले. या कार्यक्रमाचे कार्यक्रम समन्वयक म्हणून कास्ट प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. दगडू पारधे व संशोधन सहयोगी डॉ. शुभांगी घाडगे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button