युवा संस्कार सोहळा शिबिरात पेमगिरीभूषण रोहित डुबे पाटील करणार मार्गदर्शन
व्यवसायाची पंचेंद्रिये या विषयावर चर्चासत्र
संगमनेर | बाळासाहेब भोर : ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या व नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीत 10 ते 14 मे दरम्यान चार दिवसीय युवा संस्कार सोहळा शिबीर सुरु आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात हे शिबीर संपन्न होत आहे. या शिबिरात व्यसनमुक्ती, अध्यात्म व विज्ञान, अध्यात्म व मानवी जीवन, व्यवसाय, योग व आहार, भविष्यातील आव्हाने अशा विविध विषयांवर तज्ञांचे व्याख्याने व चर्चासत्र आयोजित केलेली आहेत. त्याचबरोबर भजन, कीर्तन, प्रार्थना, काकडा, पारायण हे धार्मिक दैनिक कार्यक्रम सुरु आहेत.
याच शिबिराच्या अनुषंगाने पेमगिरीचे पुण्यातील प्रतिथयश उद्योजक रोहित डुबे शनिवारी सकाळी 9 वाजता व्यवसायाची पंचेंद्रिये या विषयावर चर्चा सदरात उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत. अनेक नवउद्योजकांच्या मनातील प्रश्नांचा ऊहापोह या चर्चासत्रात होणार आहे. पेमगिरीचे भूमिपुत्र असलेले रोहित डुबे हे सध्या पुणे येथे असून उद्योग व्यवसायात त्यांनी जिद्द व संघर्षातुन उत्तुंग भरारी घेतलेली आहे.
पेमगिरीतील हनुमान मंदिराचा कायापालट असो वा भारतातील सर्वात उंच हनुमान गदा उभारणीचा संकल्प त्यांनी पूर्ण करून दाखविला आहे. ‘बोलें तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणे त्यांनी गावच्या मातीशी व माणसांशी असलेली नाळ आता आणखीच घट्ट केली आहे व आता ऐतिहासिक शहागडाचा विकासरुपी शिवधनुष्य ते गावकऱ्यांच्या सहकार्याने लीलया पेलतील यात तिळमात्र शंका नाही. कोणताही विषय असो तो प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचविण्याचा रोहित भाऊंचा एक विशिष्ट हातखंडा आहे.
एखाद्या विषयावर मनोगत व्यक्त करताना त्यांच्याकडे असलेला अफाट शब्दसाठा त्यांच्या कर्तृत्वाची खरीखुरी उंची दर्शवितो. त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास, भारदस्त आवाज, रोखठोक भाषाशैली व मधेच एखादा खणखणीत विनोदी षटकार त्यांच्या सर्वसमावेशक व्यक्तीमत्वाचे गुण ठळकपणे दाखवून देतो. तसेच एखादं काम नियोजन केल्याप्रमाणे झालं नाही तर ते जाहीरपणे कडक शब्दांत नाराजीही व्यक्त करतात.
पण जसं एखादं लहान मुल जर अनवाणी पायाने उन्हात फिरत असेल तर ती माऊली त्या मुलाला रागाने म्हणते की सावलीत मर. पण त्या माऊलीचे शब्द जरी कठोर वाटत असले तरी त्या शब्दात मायेची, आपुलकीची ऊब असते. त्याप्रमाणेच रोहित भाऊ एखाद्या बाबतीत नाराज जरी झाले तरी त्यात त्यांच्या अंतःकरणातील तळमळ नेहमीच दिसून येते. स्वार्थ व गुलामगिरीने बरबटलेल्या आजच्या समाजात रोहित भाऊंसारखं दातृत्व असलेलं सर्वसमावेशक व्यक्तीमत्व गावाला लाभणे ही खरोखरच गौरवशाली बाब आहे.
कुठेही मोठेपणाचा आव नाही. एखादी गोष्ट करणार म्हणजे करणार हा आत्मविश्वास हा संकल्प ते प्रत्यक्षात पूर्ण करतात, याची अनेक उदाहरणं आहेत. प्रत्येक माणसात काहीतरी विशिष्ट कलागुण असतात ते ज्याचे त्याला शोधता आले पाहिजेत. व्यवसाय कोणताही असो त्यासाठी योग्य नियोजन व येणाऱ्या संधीचा योग्य वेळी फायदा घेतला तरच त्याचा उपयोग होतो. याच अनुषंगाने उद्योग क्षेत्राशी निगडित असलेले रोहित डुबे व्यवसायाची पंचेंद्रिये या विषयावर चर्चासत्रात सर्वांना अनमोल मार्गदर्शन करणार आहेत.