महाराष्ट्र

प्रा.डॉ. कदम यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख व रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले प्रा. डॉ. सदाशिव कदम यांची संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली.

प्रा.डॉ. कदम हे श्रीरामपूर येथे १९९१ ते २००५ या काळात हिंदी विषयाचे अध्यापक होते. त्यांच्या निवडीबद्दल श्रीरामपूर साहित्य व सामाजिक परिवारातर्फे गौरवपूर्ण अभिनंदन करण्यात आले. दि.९ मे २०२३ रोजी आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून लौकिक असणारी” रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदी मा.खा.शरदराव पवार यांची फेर निवड करण्यात आली.

सातारा येथे घेण्यात आलेल्या बैठकीत संस्थेच्या उपाध्यक्ष, मॅनेजिंग कौन्सिल व इतर विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. या बैठकीत प्रा.डॉ. सदाशिव कदम यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलमध्ये सदस्य पदी बिनविरोध निवड करण्यात आली. मॅनेजिंग कौन्सिल ही रयत शिक्षण संस्थेची धोरणात्मक निर्णय घेणारी उच्चस्तरीय कमिटी म्हणून ओळखली जाते.

मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवड झालेले प्रा. डॉ. सदाशिव कदम हे मुळचे वडशिंगे ता.माढा येथील रहिवासी असून बॅ.पी.जी.पाटलांच्या आशीर्वादाने “विश्व भारती शांतिनिकेतन, विद्यापीठ प.बंगाल येथे गेले व तेथून एम.ए.पीएच.डी. ची पदवी घेऊन ते रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले.

डॉ. कदम यांच्या जडणघडणीत बॅरिस्टर पी.जी.पाटील, प्रा.डाॅ.एन.डी पाटील व ॲड.रावसाहेब शिंदे यांचा सहवास व प्रेमाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्यावर असलेला गांधी विचारांचा मोठा प्रभाव जाणवतो. यापूर्वी त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबर बोर्डाचे चेअरमन म्हणून उत्कृष्ट काम केलेले आहे. सदर निवडीमुळे रयत सेवक व रयत परिवारातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. निवडीनंतर रयतसेवकांकडून डॉ. कदम यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. कदम म्हणाले, हा बहुमान केवळ माझा नसून संस्थेतील नि:स्पृहपणे काम करणाऱ्या प्रत्येक सेवकाचा आहे. कारण त्यांच्या सहकार्यामुळे व रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देशाचे नेते मा.शरदचंद्र पवार, चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथकाका शिंदे यांच्या आशीर्वादाने माझ्या सारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला ही संधी मिळाली आहे. भविष्यात बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचाराला अभिप्रेत असलेले काम करून संस्थेचा लौकिक वाढवण्यासाठी योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button