सामाजिक

माऊली वाचनालयास कपाटाबरोबर पुस्तकांची भेट

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळील माऊली वृद्धाश्रमात माऊली वाचनालय सुरु करण्यात आले असून त्यासाठी राष्ट्रपती विजेते सेवानिवृत्त प्राचार्य बबनराव तागड यांनी सुंदर असे कपाट दिले तर डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कपाटभर पुस्तके प्रदान करण्यात आली आहे.

माऊली वृद्धाश्रमात वाचनालय असावे अशी तेथील संस्थापक अध्यक्ष सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, आजी, आजोबा आणि वाचक वर्गाची मागणी होती. त्यासाठी वृद्धाश्रमात माऊली वाचनालय सुरु करण्यात आले. डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणाले, वृद्धाश्रमातील वास्तव्य करीत असलेले आजी, आजोबा आणि संचालक अतिशय चांगले वाचक आहेत. त्यांनी वेळोवेळी अनेक पुस्तकावर अचंबित करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, सर, तुमचे हे पुस्तक वाचले, ती कथा वाचली, आत्मचरित्र वाचले, कसे जगलात, शिकलात तुम्ही? असे प्रश्न विचारत, वृद्धाश्रमात वाचन संस्कृतीची श्रीमंती पाहून फार आनंद वाटला. त्यातच पुस्तकप्रेमी, सेवाभावी असलेले बबनराव तागड यांनी अतिशय सुंदर कपाट दिले, ते कपाट पुस्तकांनी भरून दिले, तो आनंद मोठा आहे. कारण आजची पिढी काहीशी वाचनापासून दुरावत आहेत तर वृद्धाश्रमातील वयोवृद्ध मंडळी खूप वाचन करतात ही समाधान देणारी बाब आहे, उपस्थित सर्वांनी आनंद व्यक्त केला.

सुभाष वाघुंडे म्हणाले, 2017 पासून आम्ही वाचनालयाचे हे स्वप्न पाहत होतो, पण जागा नव्हती, आता मंदिर झाले, पण सभामंडप नाही, बांधकामे अपूर्ण आहेत, गोशाळा सुरु करण्याची मानसिकता आहे, लोकांनी हातभार लावला तर सेवाभावी कामे पूर्ण करू, आज वाचनालयाचे स्वप्न पूर्ण झाले. सौ. कल्पनाताई वाघुंडे म्हणाल्या, डॉ. उपाध्ये यांनी एक कपाट पुस्तकांनी भरविले पण अजून 02 पोतेभर पुस्तके शिल्लक आहेत, अशी कपाटे मिळाली तर वाचनालय वाढेल. आता बाल वसतिगृह तयार होत आहे, त्यासाठी मुलांना वाचनाची गोडी लागली पाहिजे, असाही प्रयत्न आहे. प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य शंकरराव अनारसे,प्राचार्य बबनराव तागड, सुखदेव सुकळे, राजेंद्र देसाई, भीमराज बागुल, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे इत्यादींनी वाचनालयास अनेक पुस्तके दिली. वरील मान्यवरांबरोबर यावेळी बाळासाहेब बनकर, बापूसाहेब पटारे, प्राचार्य के. एच. काळे, रामनाथ सावंत, कवी आनंदा साळवे, लेविन भोसले आदी उपस्थित होते.

प्राचार्य शेळके यांनी वाचन म्हणजे मनाला माणूसपण देणारी संस्कृती आहे, मनातले ताणतणाव दूर होतात. माणसाने माणसाला समजून घेणारी संस्कृती म्हणजे वाचनालय होय, असे सांगून ते सुरु झाल्याबद्दल त्यांनी वाघुंडे परिवाराचे कौतुक केले. पत्रकार राजेंद्र देसाई, शुभम नामेकर यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button