डॉ.ज्ञानेश्वर सानप यांची राज्य सामाजिक न्याय परिषदेच्या सदस्यपदी निवड
संगमनेर | बाळासाहेब भोर : संजीवनी फाउंडेशनचे चेअरमन डॉ.ज्ञानेश्वर वसंतराव सानप यांची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
राज्य सामाजिक न्याय परिषदेच्या एकवीस सदस्यीय मंडळावर संगमनेर येथील डॉ.ज्ञानेश्वर सानप यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक कार्यात डॉ.ज्ञानेश्वर सानप यांनी संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत. अतिशय कमी वयात समाजकार्याचा वसा हाती घेत डॉ.सानप यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. संजीवनी अभिरूप युवा विधानसभा हा संपूर्ण राज्यातील युवकांसाठी आदर्शवत असा उपक्रम महाराष्ट्रात सर्वात प्रथम राबविणारी संजीवनी फाउंडेशन ही एकमेव संस्था आहे.
डॉ.सानप यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारच्या राष्ट्रीय एकात्मता परिषदेचा राष्ट्रीय युवा प्रेरणा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. डॉ.सानप यांच्या या निवडीमुळे संगमनेर तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी अभिनंदन केले आहे.