राहुरी बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार
राहुरी | अशोक मंडलिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून निवडणूक रिंगणात किती उमेदवार असतील हे निश्चित होईल. काल बुधवार अखेर सोसायटी मतदार संघातून १९ जणांनी तर ग्रामपंचायत मतदार संघातून ६ असे २५ अर्ज मागे घेण्यात आले आहे.
२८ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी २३५ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यात छाननी नंतर २१५ अर्ज शिल्लक राहिले असून काल अखेर एकूण २५ अर्ज मागे घेतले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्राजक्त तनपुरे, सभापती अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे हे प्रयत्न करीत आहे.
तर विरोधी आघाडीच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शानाखाली खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले हे एकास एक उमेदवार देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे व सत्ताधारी गटातील पूर्वाश्रमीचे विकास मंडळाचेच असलेले ४ संचालकांनी सत्ताधारी गटातून बाहेर पडल्याने विरोधी गटामध्ये चैतन्य पसरले आहे. त्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सुरेश लांबे हे स्वतंत्र पॅनल उभा करण्याच्या तयारीत असून त्यांना कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.