अहमदनगर

बौद्ध धम्म हा पुर्णत: वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारा आहे – सौ. शालिनीताई विखे पाटील

सात्रळ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद 
राहुरी | बाळकृष्ण भोसले –  राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसोबत हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. पूर्वीच्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मोठ्या जनसमुदायाला इथल्या मनूवादी चातुर्वर्ण्य व्यवस्थेने त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवले होते. या धर्मांतरामागची पार्श्वभूमी आपण पहिल्यांदा समजावून घेतली पाहिजे. बौद्ध धम्म हा पुर्णत: वैज्ञानिक दृष्टिकोन सांगणारा धर्म असल्याचे मत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर : धम्मचक्र प्रवर्तन- माझा दृष्टिकोन” या विषयावरील आंतरराष्ट्रीय पातळीवरील एक दिवसीय परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक ॲड. आप्पासाहेब दिघे होते.
परिसंवादाची भूमिका समन्वयक व मराठी विभागप्रमुख डॉ. नवनाथ शिंदे यांनी मांडली. प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक मुख्य समन्वयक व सा. फु. पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रो. डॉ. मनोहर जाधव केले. याप्रसंगी परिसंवादाचे उद्घाटन मा. सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
अभ्यासकांच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मॉरिशस येथील महात्मा गांधी संस्थेचे ज्येष्ठ प्रो. डॉ. बीदन आबा, मध्य प्रदेश, भोपाळ येथील कथाकार भारतीय प्रशासकीय सेवाधिकारी श्री. कैलास वानखेडे, ज्येष्ठ लेखक आणि माजी कुलगुरू प्रो. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे,  सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रो. डॉ. शरणकुमार लिंबाळे, सा. फु. पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्रमुख प्रो. डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी मूलभूत विचार व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे डायरेक्टर एज्युकेशन व प्राचार्य प्रो. डॉ. प्रदीप दिघे, राहाता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप आदी उपस्थित होते. डॉ. गंगाराम वडीतके यांनी आभार मानले. डॉ. अनंत केदारे व प्रा. दीप्ती आगरकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Back to top button