अहमदनगर

राज्यातील सहकार चळवळीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे नेण्याचा पतसंस्था फेडरेशनचा प्रयत्न – काका कोयटे

राहुरी / बाळकृष्ण भोसले : महाराष्ट्रात सहकार चळवळीचा आता वटवृक्ष झाला आहे. सहकाराचे महत्व आता अधोरेखित झाले आहे. केंद्रानेही या चळवळीची दखल घेत राष्ट्रीय स्तरावर सहकारासाठी स्वतंत्र खाते निर्माण केले असून त्यासाठी अमित शहांसारख्या जबाबदार नेतृत्वाच्या हातात देशाच्या सहकार चळवळीची धुरा दिली आहे. त्यामुळे संपर्ण देशाचे लक्ष सहकाराकडे वेधले आहे. त्यातच राज्यातील सहकार चळवळीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे नेण्याचा राज्य पतसंस्था फेडरेशनचा प्रयत्न असून नगर जिल्ह्याचा सहकार राज्याला दिशादर्शक ठरला आहे. दिवसेंदिवस सहकाराचे महत्व वाढत चालले असून महाराष्ट्रात सहकाराचे धडे गिरविण्यासाठी देशातील अनेक तज्ज्ञ येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केले.
राज्य सहकार पतसंस्था फेडरेशनच्या वतीने महाराष्ट्रात सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनापासून या सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी सहकारातील ज्येष्ठनेते स्व. डॉ. दादासाहेब तनपुरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. राहुरी येथील प्रेरणा मल्टीस्टेटच्या सभागृहात हा सप्ताह सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. त्यानिमित्ताने राहुरी येथे फेडरेशनच्या वतीने ध्वजारोहन करण्यात आले. तर दि. १४ नोव्हेंबरपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांचे ऑनलाईन व्याख्यान सुरू असल्याची माहिती कोयटे यांनी दिली.
कोयटे म्हणाले, राज्यात फेडरेशनच्या अधिपत्याखालील २ लाख बचत ठेव प्रतिनिधी संकलन करीत असताना त्यांचा दररोज सुमारे २ कोटी कुटुंबियांबरोबर संपर्क येतो. राज्यात ४ कोटी ५५ लाख सभासद संख्या सहकारी संस्थांची असून त्यातील २ कोटी २३ लाख सभासद पतसंस्थेेचे आहेत. एवढी मोठी व्याप्ती सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. नगर जिल्ह्यात कै. बॅ. धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, स्व. डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी सहकाराची पायाभरणी केली आहे. राज्य नागरी पतसंस्था फेडरेशन व मल्टीस्टेट संस्थेचे नेतृत्व नगर जिल्ह्याकडेच असल्याने आता पुन्हा या सहकार चळवळीला सुवर्णदिन आणण्याची जबाबदारी नगर जिल्ह्यावर आली असल्याचे कोयटे यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी संघाचे अध्यक्ष, श्रीसाईबाबा संस्थानचे विश्‍वस्त व प्रेरणा समूहाचे संस्थापक सुरेशराव वाबळे म्हणाले, राज्याचे सहकाराबाबत देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, स्व. डॉ.दादासाहेब तनपुरे, सहकार महर्षी स्व.भाऊसाहेब थोरात, स्व. शंकरराव काळे, स्व. मारूतराव घुले पाटील, ज्येष्ठनेते शंकरराव कोल्हे, यशवंतराव गडाख यांनी नगर जिल्ह्यात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. जिल्ह्यातील सहकार चळवळीला पुन्हा उर्जितावस्था आली असून ग्रामीण बाजारपेठ आणि लघुउद्योजक, बेरोजगार तरूणांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम या पतसंस्था चळवळीने केले आहे. ज्याची आर्थिक पत आहे, त्याला पतसंस्थेने तारले असल्याचे वाबळे यांनी सांगितले. राज्यात केवळ सहकारी चळवळीतील पतसंस्थाच हा सहकार सप्ताह पाळून सहकाराचा गौरव करीत असून अन्य कोणत्याही सहकारी संस्था या सहकार सप्ताहाचे पालन करीत नसल्याची खंत वाबळे यांनी व्यक्त केली.
स्थैर्यनिधीचे उपाध्यक्ष वसंत लोढा म्हणाले, सुरेशराव वाबळे व काकासाहेब कोयटे यांच्या संकल्पनेतून स्थैर्यनिधीची स्थापना करण्यात आली. ज्या संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्या, त्यांना पुन्हा आधार देण्याचे काम स्थैर्यनिधी संस्थेने केले आहे. त्यामुळे अनेक अडचणीत आलेल्या पतसंस्था पुन्हा प्रगतीपथावर असल्याचे लोढा यांनी सांगितले.
यावेळी संचालक व साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, संचालक आर.डी. मंत्री, रवींद्र बोरावके, पुखराज पिपाडा, आदिनाथ हजारे, बाळासाहेब उंडे, प्रेरणा पतसंस्थेचे जनरल मॅनेजर गोरक्षनाथ चंद्रे, अनिल वर्पे, रवींद्र हिवाळे, आदी उपस्थित होते.
यावेळी ज्योती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व स्थैर्यनिधीचे संचालक रवींद्र बोरावके यांची भारत संचार निगम लि. नवी दिल्लीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल बोरावके यांचा व राहुरीच्या उपनगराध्यक्षपदी सौ.नंदाताई उंडे यांचा स्थैर्यनिधीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Related Articles

Back to top button