अहमदनगर

श्रीक्षेत्र पिंपळगाव माळवी

अहमदनगर : आज आपण जिल्ह्यातील नगर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळगाव माळवी या श्रीक्षेत्राविषयी माहिती पाहणार आहोत. 
श्रीक्षेत्र पिंपळगांव माळवी येथे श्रीचक्रधर स्वामी शके ११९१ (इ.स. १२६९) मध्ये आपल्या महाराष्ट्र भ्रमण काळात आले होते. सीना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली स्वामींना भोजन झाले. महानुभाव पंथाचे द्वितीय आचार्य श्रीभाईदेव व्यास यांनी या ठिकाणी पाषाणाची एक शिळा स्थानाची खूण म्हणून बसविली. त्यानंतर काही वर्षांनी आचार्य श्रीकमलाकरमुनि कोठी यांनी या ठिकाणी चिरेबंदी पाषाणाचा एक ओटा तयार केला. तीच स्थान स्थापना होय. त्यानंतर जवळपास ७०० वर्षांनी इंग्रज राजवटीत अहमदनगर शहराला पाणी पुरवठ्याकरिता सीना नदीवर बांध घालून पाणी अडविले. तोच पिंपळगांवचा तलाव होय.
या तलावाच्या पाण्याखाली ते स्वामींचे नमस्करणीय स्थान गेले. पाणी आटले की हे स्थान दर्शनासाठी खुले होत असे. कालांतराने या तलावाचे पाणी अहमदनगर शहराला पुरविण्याकरिता इंग्रज सरकाने व्यवस्था केली. तलावाचे पाणी आटणार नाही याची अहमदनगर नगरपालिका दक्षता होत असे. त्यामुळे हे स्थान सतत पाण्याखाली राहत असे.
दुष्काळ पडला की पाणी आटत असे. मात्र खुप गाळ साचल्याने स्थानापर्यंत जाता येत नसे. तेव्हा भरावापासून दगड आणि चुना टाकून स्थानापर्यंत जाण्यासाठी पाऊलवाट तयार करण्यात आली. काही काळाने तो रस्ता व स्थान दोन्हीही गाळाखाली गेले. एक दिवस असा आला की, हे स्थान नेमके कोठे आहे ते सांगणारी माहितगार व्यक्ती राहिली नाही.
बऱ्याच महानुभावांनी स्थान शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तलावाचा परिघ खुपच मोठा असल्याने ते प्रयत्न निष्फळ ठरले. इ.स. २०१० मध्ये प.पू.प.म.श्रीमामाजी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने, परमार्गाच्या सहाय्याने तसेच पू.ई. श्रीकाकाजींच्या तीन वर्षांच्या अथक प्रयत्नाने या स्थानाचा शोध लागला, हे देवस्थान भक्तांना दर्शनासाठी खुले झाले.

Related Articles

Back to top button