धार्मिक

जीवनात तारण होणेसाठी पवित्र मारीयेची मध्यस्थी महत्वाची-फा. अब्राहम

मतमाउली यात्रापूर्व दुसरा शनिवार नोव्हेना संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव येथील संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे अमृत महोत्सवी यात्रेच्या दुसऱ्या शनिवारी ‘पवित्र मारीयेचे ध्येय तुझ्या इच्छेप्रमाणे होवो’ या विषयावर बाळ येशू चर्च बाभळेश्वर व प्रवरानगर येथील निष्कलंक माता चर्च येथील धर्मगुरू फा. अब्राहम रणदिवे व फा. विलास सोनवणे यांनी नोव्हेनात सहभागी झाले होते.

त्यावेळी फा. अब्राहम रणदिवे यांनी ‘पवित्र मारीयेचे ध्येय तुझ्या इच्छेप्रमाणे होवो’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना प्रतिपादन केले की, संत लूकच्या अध्यायामध्ये ख्रिस्ताचा संदेशात पवित्र मरिया व गाब्रीयल यांच्यामध्ये संवाद झालेला आहे. यात प्रभूच्या दूताने संदेश दिला आहे की, हे कृपा पावलेले श्रेय तू धन्य आहेस. तुला परमेश्वराने त्याच्या पुत्राची माता होणेसाठी निवडले आहे व तुला पुत्र होईल. ती म्हणते मला पुरुष ठाऊक नाही. देवदूत तिला सांगतो की, देवाचा पवित्र आत्मा तुझ्यावर येईल व त्याचे व्दारे तू गर्भवती होईल व तुला जो पुत्र प्राप्त होईल त्याला येशू म्हणजे तारणाला म्हणतील.

तो जगाच्या पापापासून तारण करील. ती त्याला म्हणते तुझ्या शब्दाप्रमाणे, इच्छेप्रमाणे होवो. प्रभू येशू हा लोकांना संदेश देत होता. सुवार्ता सांगत असताना त्याची आई व त्याचे भाऊ त्याला भेटायला आले. त्यांना सांगतो जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तेच माझे भाऊ आणि आई, तर त्याला ठाऊक होते की त्याची आई ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागत होती. जे लोक देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात ते सुद्धा त्याची आई व भाऊ आहेत. आपण सुद्धा देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो आपण सुद्धा त्याचे भाऊ व आई आहोत. पवित्र मारीयेने देवाची इच्छा आपल्या जीवनात स्वीकारली म्हणजे तिने देवाच्या तारणदायी योजनेला आपल्या जीवनात स्वीकारले आहे, देवाची तारणदायी योजनाला तिने होकार दिला आहे व तिने देवाच्या पुत्राला आपल्या उदरात जन्म दिला.

अशा प्रकारे जीवनात त्याला स्थान दिले आहे. तिने देवाची तारणदायी योजना अंमलात आणली आहे. आपल्या जीवनात आपले तारण होण्यासाठी तिच्यासारखे देवाला सहकार्य केले पाहिजे. म्हणजे आपले तारण होते. ती प्रभू येशूकडे आपली मध्यस्थी पापापासून मुक्त होणेसाठी तारण होणेसाठी करत असते. आपले आजार व दुखासाठी यशस्वीपणे मध्यस्थी करते व ती मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी प्रार्थना म्हणजे पवित्र माळ आदी पवित्र मारीयेचा महिमा वर्ण केला.

या नोव्हेनात हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक, रिचर्ड, सचिन आदी सहभागी होते. येत्या दि. १५ जुलै रोजी तिसऱ्या शनिवारी ज्ञानमाउली चर्च नेवासा, संत योसेफ चर्च केंदळ येथील धर्मगुरू प्रवचन करतील. त्यासाठी सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे तसेच सर्व धर्मभगिनी ग्रामस्थ हरेगाव, उंदीरगाव यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button