कृषी

कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथे कृषि यांत्रिकीकरण दिवसाचे आयोजन

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहु महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापुर येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, मफुकृवि, राहुरी, महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कोल्हापुर तसेच कृषि अवजारे उत्पादन संघटना (AIMA, महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापुर येथे मंगळवार दि. 5 मार्च, 2024 रोजी कृषि यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात येणार आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांनी शेतीत जास्तीत जास्त सुधारित यंत्रे व कृषि अवजारांचा वापर करावा हा उद्देश ठेवुन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेनुसार भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत येणार्या व कृषि विद्यापीठात असणार्या अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामार्फत देशभरात एकाच दिवशी 05 मार्च 2024 रोजी कृषि यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात येतो. कोल्हापूर कृषि महाविद्यालयात होणार्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील हे असणार आहेत.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे उपाध्यक्ष ना. प्रकाश आबिटकर, नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कृषि मंत्रालयांतर्गत असणार्या यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विजय काळे, चेन्नई, तामिळनाडु येथील कृषि अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता डॉ. थिरु आर. मुरुगेसन, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे व कार्यकारी परिषदेचे सदस्य दत्तात्रय उगले आणि विशेष अतिथी म्हणुन अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. चिदानंद पाटील, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कोल्हापुर कृषि विभागाचे सहसंचालक बसवराज बिराजदार, कृषि अवजारे उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील यावेळी उपस्थित असणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापुर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, अ.भा.स. कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशिदास बास्टेवाड व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी केलेे आहे. कृषि यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्याचे हे 9 वे वर्ष असून सदर कार्यक्रमाद्वारे नवनविन कृषि अवजारांची माहिती व प्रात्यक्षिके शेतकर्यांना दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये शेतकर्यांनी संशोधित केलेली अवजारे व यंत्रे, ट्रॅक्टर व कृषि अवजारे उत्पादित कंपनी यांचेही स्ट्राल व प्रात्यक्षिके, कृषि यांत्रिकीकरणाविषयी व्याख्याने व चर्चासत्रे शेतकर्यांसाठी आयोजित केली जाणार असल्याचे अवजारे विभागाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button