कृषी

ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, हायपरस्पेक्ट्रल इमेजींग, इनडोअर फार्मिंग, यंत्रमानव हे भविष्यातील शेतीची दिशा ठरवणार आहे – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : विकसित भारत 2047 च्या अनुषंगाने हे आंतरराष्ट्रीय संमेलन यशस्वी आणि अभिनव झाले आहे. देशातील शास्त्रज्ञांमध्ये व प्राध्यापकांमध्ये फार प्रतिभा आहे. फक्त त्याला आव्हान मिळणे गरजेचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिक विकास होण्यासाठी शासकीय-शासकीय भागीदारी गरजेची आहे. शेतकरी नवीन डिजिटल तंत्रज्ञान वापरण्यासाठी उत्सुक आहेत, फक्त ते शेतकरीभिमूख असणे गरजेचे आहे. ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, हायपरस्पेक्ट्रल इमेजींग, इनडोअर फार्मिंग, यंत्रमानव हे भविष्यातील शेतीची दिशा ठरवणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतीक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रांतर्गत दोन दिवसीय भविष्यातील शेती या विषयावर आंतरराष्ट्रीय संमेलनात एक आंतरराष्ट्रीय परिषद व पाच आंतरराष्ट्रीय परिसंवादांचे आयोजन करण्यात आले होतेे. या समारंभाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते.

या परिसंवादाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महिको कंपनीचे चेअरमन व सदस्य भाकृअप- नाहेप ड़ॉ. राजू बारवाले उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीमध्ये गुजरात येथील आंनद कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.बी. कथारीया, कास्ट प्रकल्पाचे आणि भा.कृ.अ.प.-रा.कृ.उ.शि.प्र.चे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अनुराधा अग्रवाल, संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. राजू बारवाले म्हणाले की गेली 40 वर्ष मी कृषि क्षेत्रात एक खाजगी कंपनी चालवीत आहे. परंतु या परिषदेच्या निमित्ताने राज्यातील कृषि विद्यापीठांचे बदलते व स्वागतार्ह स्वरूप मी बघत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घातल्याशिवाय कुठल्याच क्षेत्राची प्रगती होऊ शकत नाही. कृषि क्षेत्रातील इतर अनेक आव्हानांपैकी मनुष्यबळाची अनुपलब्धता, अकुशल मजूर या प्रश्नांची उत्तरे फक्त तंत्रज्ञानच देऊ शकते असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

कुलगुरू डॉ. के. बी. कथारिया मार्गदर्शन करताना म्हणाले नाहेपमुळे हा कास्ट प्रकल्प विद्यापीठांमध्ये आला व या प्रकल्पामुळे जगातील तंत्रज्ञानाची ओळख शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांना झाली. अद्ययावत तंत्रज्ञानाची निर्मिती विद्यापीठांमध्ये होऊ लागली. नक्कीच हे तंत्रज्ञान शेतकर्यांना भविष्यात फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. अनुराधा अग्रवाल आपल्या मार्गदर्शनात म्हणाल्या कृषि विद्यापीठांमध्ये स्थापन झालेल्या कास्ट प्रकल्पांपैकी फक्त महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या प्रकल्पाने सर्व उद्दिष्टे साध्य केले आहे. राहुरीच्या कास्ट प्रकल्पाने आदर्श प्रकल्प कसा असावा याचे इतरांसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे. कृषि क्षेत्रातील शैक्षणिक संस्थांनी खाजगी कंपन्यांशी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना संशोधनाची नवीन दालने उपलब्ध करून दिली पाहिजे. यामुळे अद्ययावत तंत्रज्ञानाची उपलब्धता याद्वारे होऊ शकते.

या संमेलनात आधुनिक कृषि तंत्रज्ञान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आणि कृषिमध्ये ड्रोनचा वापर, कृषिमध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता व हायपरस्पेक्ट्रल इमेजींग, इनडोअर फार्मिंग, कृषिमध्ये यंत्रमानवाचा उपयोग, कृषिमध्ये आय.ओ.टी. चा वापर या सहा विषयांवर परिसंवाद पार पडले. या परिसंवादांमध्ये 114 तज्ञांचे सादरीकरण झाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. सुनील गोरंटीवार म्हणाले विद्यापीठाने देशातील नऊ तंत्रज्ञान संस्थांबरोबर तंत्रज्ञान देवाण-घेवाणसाठी आणि नविन तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. याप्रसंगी आय.आय.टी. कानपूर बरोबर नमामी गंगेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर आय.आय.टी. कानपूरचे प्रा. विनोद तारे आणि कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी स्वाक्षर्या केल्या.

याप्रसंगी नियंत्रक सदाशीव पाटील यांनी थायलंड अभ्यास दौर्यातील त्यांच्या वित्त विषयाच्या दृष्टीकोनातून सादरीकरण केले. डॉ. पवण कुलवाल यांनी या दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परीषदेत सादर केलेल्या संशोधन व तज्ञ व्याख्यानांचा परीपाक सादर केला. डॉ. अतुल आत्रे यांनी पोस्टर सादरीकरण करणार्या शास्त्रज्ञांची यादी सादर केली आणि मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पोस्टर सादरीकरण केलेल्या शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.

या आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये थायलंड येथील शास्त्रज्ञ डॉ. मंजूल हजारीका, व्हिएतनाम येथील शास्त्रज्ञ डॉ. हा नाम थांक, जपान येथील शास्त्रज्ञ डॉ. असाई थांबी मानीकाम, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कलुगरु डॉ. व्यकंट माईंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, माजी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ उपस्थित होते.

या दोन दिवस झालेल्या राष्ट्रीय संमेलनात विविध विद्यापीठातील महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ, बाहेरच्या देशातील शास्त्रज्ञ, देशातील विविध राज्यामधील शास्त्रज्ञ, उद्योजक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दोन दिवसीय परिसंवादाचे ऑनलाईन स्ट्रिमींगद्वारे जगातील शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कास्ट प्रकल्पाचे संशोधक डॉ. मुकुंद शिंदे यांनी तर आभार डॉ. अधिर आहेर यांनी मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button