महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील पेन्शनधारकांचे बुलढाणा येथे 1757 व्या दिवशी उपोषण

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अहमदनगर जिल्ह्यातील ईपीएस 95 पेन्शन धारकांनी सोमवार दि. १६ आगस्ट २०२३ रोजी बुलढाणा येथील उपोषण मंडपात बसून तेथे गेली १७५७ दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री उपोषणात सहभाग नोंदविला असल्याची माहिती श्रीरामपूर येथे पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी बैठकीत दिली.

जिल्ह्यातील ५७ पेन्शनर पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंत वाळके व महिला आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे यांचे नेतृत्वाखाली उपोषणात सहभागी झाले होते. उपोषण मंडपात बुलढाणा येथील कार्यकर्त्यांनी सर्वांचे स्वागत केले.

याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या सर्वांच्या लढ्याला लवकरच यश प्राप्त होईल, पण यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवून घेण्यासाठी गरज भासल्यास आपणांस एक मोठे आंदोलन करावे लागेल. सर्वांनी जागृत होऊन तयारीत राहावे. या लढाईत अहमदनगर जिल्हा नेहमीच आघाडीवर राहून सक्रिय सहभागी होत असल्याने समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, जिल्हाध्यक्ष समिंदर, तालुकाध्यक्ष वाळके अप्पा, महिला आघाडी अध्यक्षा आशाताई शिंदे, बुलढाणा मुख्य समन्वयक विलास पाटील, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती शोभाताई आरस, जी.के.चिंतामणी, कव्हेकर यांची समयोचीत भाषणे झाली. श्रीमती मंजुळाबाई रायकर यांनी पेन्शनर जागृतीसाठी एक सुंदर गीत सादर केले. श्रीगोंदा, संगमनेर, राहाता, नगर, नेवासा, अकोले तालुक्यातील पेन्शन धारकांनी मोठ्या संख्येने शेगाव येथील मेळाव्यात सहभाग घेतला व कमांडर अशोकराव राऊत व संघटनेचे जेष्ठ पदाधिकारी यांचा सत्कार केला.

प्रामुख्याने नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, विनायक लोळगे, नगर उपाध्यक्ष भिमराज भिसे, संगमनेर उपाध्यक्ष सुलेमान शेख, सुरेश कटारिया, विनायक जगताप, शिवाजी गिरी, पारनेरचे विठ्ठल गागरे, बेलवंडी अध्यक्ष जालिंदर शेलार, अकोले तालुक्यातील निवृत्ती कर्पे, माणिक अस्वले यांच्यासह शेकडो पेन्शनर उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button