मराठा आरक्षणाविरोधात मी कोणतेही पत्र पाठविले नाही – अशोक तुपे
राहुरी | अशोक मंडलिक : सोशल मीडियावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, असे पत्र मंत्रालयात मी पाठवले असल्याचा संदेश सध्या समाज माध्यमांवर प्रसारीत होत असून त्या संदेशाचा व माझा काहीही संबंध नाही. असा संदेश प्रसारीत करणाऱ्यांच्या विरोधात मी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यांची लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती सावता माळी युवक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी दिली आहे.
तुपे यांनी पत्रकात म्हटले, मी वांबोरी येथील रहिवासी असून माझा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असतो. मराठी समाजातच मी कार्यरत असतो. मी एक गरीब कुटुंबातील बेरोजगार असून प्रत्येक गावातील आठवडे बाजारात मुरमुरे विकून माझी कुटुंबाची उपजीविका भागवत आहे. परंतु काही समाजकंटकानी मला जाणून बुजून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले असून त्या संदेशाचा आणि माझा कुठलाही संबंध नाही.
मला अनेक मराठा बांधवांचे फोन आले, मी सर्व तरुण बांधवांना विनंती करतो, मी कुठल्याही प्रकारचे मंत्रालयात पत्र पाठवलेले नसून माझ्या नावाचा गैरवापर करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. मी तातडीने राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन संदेश पाठवणाऱ्याच्या विरोधात रितसर तक्रार दिली आहे. त्याची लवकरच शहानिशा होईल. माझ्या विषयी ज्यांनी बदनामीकारक संदेश पाठवले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्या शिवाय मी माघार घेणार नाही. मी आजही मराठा समाजाबरोबर आहे, उद्याही राहील. त्यामुळे माझ्याबद्दल झालेला गैरसमज दूर व्हावा, असे अशोक तुपे यांनी सांगितले.