कृषी

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक उत्पादन वाढवावे – संशोधन संचालक डॉ. गोरंटीवार

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विविध पिकात संशोधन करुन अद्ययावत तंत्रज्ञान विकसीत केले आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञान, डिजीटल पध्दतीने शेतीसाठी पाण्याचा वापर तसेच शेतीचे पाणी व्यवस्थापन करण्यासाठी विविध मोबाईल ॲपची निर्मिती यांचा समावेश आहे.

शेतीसाठी यंत्रमानव निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसीत करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात शेतकर्यांचे शेतीमधील कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे. शेतकरी बांधवांनी विद्यापीठाच्या या अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतीमध्ये करुन पीक उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे पाणी फाउंडेशनच्या शेतकरी गटातील शेतकर्यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्पांना भेटी दिल्यानंतर डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात विद्यापीठातील शास्त्रज्ञांबरोबर संवाद साधला. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते. याप्रसंगी आंतरविद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे विभाग प्रमुख तथा कुलगुरुंचे विशेष कार्याधिकारी डॉ. महानंद माने, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, मृदाशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे, कडधान्य सुधार प्रकल्पाचे कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायाळ, कोल्हापूर येथील अ.भा.स. नाचणी व इतर तृणधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. योगेश बन तसेच पाणी फाउंडेशनचे राज्य समन्वयक नामदेव ननवरे व अहमदनगर व नाशिक विभागीय समन्वयक विक्रम फाटक उपस्थित होते.

डॉ. महानंद माने मार्गदर्शन करतांना म्हणाले की शेतकर्यांनी आधुनिक सिचन पध्दतीचा अवलंब करण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर त्यांनी अशाच प्रकारे विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी समन्वय साधला तर त्यांच्या शेतीविषयक प्रश्नांची सोडवणुक करता येईल. यावेळी डॉ. पंडित खर्डे यांनी विद्यापीठाच्या विविध प्रकाशनांबाबत तसेच विद्यापीठ राबवित असलेल्या शेतकरी प्रथम प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. योगेश बन यांनी पौष्टीक तृणधान्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील पाणी फाउंडेशनच्या फार्मर कपचे 42 शेतकरी गटातील 280 शेतकरी व महिला शेतकर्यांचा समावेश होता. सकाळच्या सत्रात त्यांनी विद्यापीठाच्या विविध प्रकल्पांना भेटी देवून माहिती घेतली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button