अहमदनगर

वांजुळपोई उपकेंद्रामुळे पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार- आ. तनपुरे

राहुरी | अशोक मंडलिक : तालुक्यातील वांजुळपोई येथील उपकेंद्राचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच सदर उपकेंद्र कार्यान्वित होऊन या भागातील शेतकर्‍यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा होईल. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची विजेची खूप मोठी समस्या दूर होणार आहे, असा विश्वास आ. प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

राहुरी तालुक्यातील वांजूळपाई येथील वीज उपकेंद्राला आ. तनपुरे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. आ. तनपुरे म्हणाले, दोन-चार दिवसांतून एकदा कसाबसा शेतीला वीजपुरवठा होत होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कृषी धोरण २०२० नुसार जिल्हा पातळीचा निधी वापरून या वीज उपकेंद्रास मंजुरी देण्यात आली होती. टेंडर प्रक्रिया सुरू होताच सरकार कोसळले.

नवीन सरकारच्या काळात कार्यारंभ आदेश मिळेपर्यंत प्रत्येक संबंधित अधिकार्‍याकडे मी स्वतः पाठपुरावा केला. आज हे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. लवकरच हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतकर्‍यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी रवींद्र आढाव म्हणाले, या भागासाठी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या काळात वांजुळपोई येथे मुळा नदीवर बंधारा बांधल्याने पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

या भागात पाणी होते पण वीज अनियमित मिळत असल्याने शेतकर्‍यांना पाणी आहे तर वीज नसल्याने शेती उजाड बनत चालली होती. आ. तनपुरे यांनी ऊर्जा राज्यमंत्री असताना राहुरी- नगर- पाथर्डी मतदार संघातील वीज उपकेंद्राच्या बरोबर राहुरी तालुक्यातील पण 32 गावे श्रीरामपूर मतदार संघातील असल्याने तालुक्यातील 32 गावांना न्याय देण्यासाठी वांजुळपोई वीज उप केंद्राची मंजुरी आणून ते पूर्ण केल्याने या भागाला न्याय दिला आहे.

यावेळी अप्पासाहेब जाधव, राजेंद्र पवार, ज्ञानेश्वर पवार, कोंडीराम विटनोर, अशोक विटनोर, दत्तात्रय जाधव, भाऊसाहेब विटनोर, सोपानराव बाचकर, काकासाहेब पवार, किशोर बाचकर, अनिल बिडे, अप्पासाहेब पवार, प्रमोद विटनोर, गोरक्षनाथ विटनोर, दत्तात्रय विटनोर, आप्पासाहेब जाधव, दत्ता बिडगर, बाळासाहेब गाडे, अमोल विटनोर, विलास चव्हाण, गोरक्षनाथ घोलप, अण्णा कायगुडे आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button