अहमदनगर

मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत मंजूर प्रकरण वाटप करण्यास बँकेकडून टाळाटाळ

लाभधारक महिलेचे आमरण उपोषणाला सुरुवात

राहुरी शहर | नाना जोशी : मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम २०२३ अंतर्गत राहुरी येथील महिलेचे मंजूर प्रकरण वाटप करण्यास टाळाटाळ केल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा राहुरीचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक तसेच सध्याचे व्यवस्थापक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बँकेसमोर सदर लाभधारक महिलेने कार्यकर्त्यांसमवेत आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

सदर उपोषणकर्त्या तक्रारदार महिला सुशिक्षित बेरोजगार असून महाराष्ट्र शासनाची सरकारी योजना मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना २०२३ अन्वये मागासवर्गीय कोट्यातून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या MCED अंतर्गत या महिलेचे प्रकरण मंजुर होवून त्यांनी शासनाचे प्रशिक्षण घेतले होते. शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेतून प्रकरण सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा राहुरी येथे मंजुर करुन पाठविण्यात आले होते.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकेकडून प्रकरण वेळेवर वाटप झाले असते तर या महिलेचा व्यवसाय सुरु झाला असता. परंतू तत्कालीन शाखा व्यवस्थापक तसेच त्यांची बदली झाल्यानंतर त्याजागी आलेल्या शाखा व्यवस्थापक यांनी प्रकरण मंजूर करण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे, स्टँप, लागणाऱ्या सर्व मंजुरी देऊनही जाणून बुजून प्रकरण वाटप करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे सदर लाभधारक महिलेला या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च आला आहे.

त्यामुळे सदर लाभधारक महिलेने शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यास अडथळा आणणाऱ्या तत्कालीन शाखा व्यवस्थापक व सध्याच्या व्यवस्थापक यांच्या विरोधात जाणीवपूर्वक त्रास दिल्याबद्दल गुन्हे दाखल होणेकामी व शासकीय योजनेचा लाभ तात्काळ मिळण्यासाठी सर्व सहकारी महिला कार्यकर्त्या यांच्या समवेत आज दि. १० ऑक्टोबर २०२३ पासून सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा राहुरी यांच्या दालनासमोर आमरण उपोषण आंदोलनास बसले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button