बुलढाणा EPS पेंशन धारकांचे साखळी उपोषण पोहचले 1724 दिवसांवर, तरीही सरकारचे दुर्लक्ष
राज्यासह देशांतील अनेक ठिकाणाहून पेंशनधारक देत आहेत भेटी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : देशातील औद्योगिक, सार्वजनिक, सहकारी, खाजगी क्षेत्रातील सेवानिवृत्त ज्यात प्रामुख्याने रस्ते वाहतूक महामंडळ, वीज मंडळ, सहकारी बँका, पतसंस्था, साखर उद्योग, विना अनुदानित शाळा महाविद्यालये, बियाणे महामंडळ, वन विकास महामंडळ, कृषी उद्योग विकास महामंडळ, वस्त्रोद्योग महामंडळ, कॉटन फेडरेशन बजाज, टाटा मोटर्स, गरवारे सारखे असंख्य 186 उद्योगात काम केलेल्या EPS 95 पेंशन धारकांची संख्या 70 लाख आहे.
या कामगारांनी दरमहा 417 रु.,541 रू., 1250 रू. अंशदान पेंशन फंडात दिले आहे आणि देश निर्मितीत ऐन तारुण्यातील 30 ते 35 वर्ष खर्ची घातले. आपले रक्त, घाम गाळून देश समृद्ध बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्यांना आज सरासरी पेंशन रु 1171 रूपये तर कितीही महागाई वाढली तरी त्यात कवडीचीही वाढ होत नाही. त्यामुळे EPS पेंशनर्स दयनीय व मरणासन्न अवस्थेत जीवन जगत आहेत. सन्मानजनक पेंशन व वैद्यकीय सुविधा अभावी दररोज सरासरी 200 पेंशनधारक मरत आहेत. त्यामुळे आज जरी देशाची प्रगती होत असली तरी EPS पेंशनधारकांची अधोगती होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
ज्यांनी पेंशन फंडात अंशदान दिलेले नाही त्यांच्या साठी सरकारच्या विविध पेंशन योजना आहेत. मात्र ज्यांनी पूर्ण सेवा काळात दरमहा अंशदान दिले त्यांना तुटपुंजी पेंशन? हे सावत्र व्यवहार का? 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते व आताचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोशियारी समितीचा अहवालानुसार 3000 रु व महागाई भत्ता 90 दिवसांत लागू करु असे निवडणुकीपूर्वी जाहिर केले होते. आज मात्र त्यांना ही विसर पडला आहे.
पती पत्नी ला जीवन जगण्यासाठी किमान मासिक पेंशन 7500 रूपये व त्याला महागाई भत्ता, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पेन्शनर मध्ये कोणताही भेदभाव न करता वास्तविक वेतनावर अंशदान घेऊन उच्च पेंशन, वृद्धापकाळात मोफत वैद्यकीय सुविधा, या योजनेपासून वंचित ठेवलेल्या कामगारांचा समावेश करुन त्यांना किमान मासिक 5000 रू. या प्रमुख मागण्यासाठी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून सातत्याने सर्व आंदोलने केलीत. अधिकारी, पदाधिकारी व मंत्री यांच्यासह पंतप्रधान महोदयांच्या 2 भेटी, चर्चा, निवेदने झालीत, आश्वासने मिळाली, मात्र सकारात्मक निर्णय अद्यापही नाही.
संघटना देशातली 27 राज्यांत कार्यरत असून या संघटनेचे मुख्यालय बुलढाणा आहे. या ठिकाणी गेल्या 1724 दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. उन, वारा, पाऊस याची कुठलीही पर्वा न करता हे वृद्ध पेंशनधारक साखळी उपोषण करीत आहे. अगदी कोरोना कालावधीत सुद्धा हे उपोषण घेऊन सुरु होते. दररोज जिल्हाधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान महोदयापर्यंत निवेदन दिले जाते. दोनदा प्रधानमंत्री यांनी व अनेकदा श्रम मंत्री यांनी आश्वासने दिलीय. नंतर सुध्दा मांगण्या मंजूर न झाल्यामुळे पेंशनधारकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. कारण हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे.
बुलडाणा येथे सुरु असलेल्या या साखळी उपोषणास राज्यातील सर्व जिल्ह्यातीलच नव्हे तर देशांतील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, गुजरातसह अनेक राज्यांतून सुद्धा पदाधिकारी व सदस्यांनी भेटी दिल्या आहेत. सोमवार दि. 11 सप्टेंबर, 2023 रोजी पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहर, खेड(राजगुरुनगर) तालुका, बारामती तालुका अशा विविध तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी व पेन्शनर्स यांनी बुलढाणा उपोषण मंडपास भेट देऊन सातत्याने साखळी उपोषणात भाग घेणाऱ्या उपोषणकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला. त्यामुळे साहजिकच एक नविन ऊर्जा निर्माण झाली.
यापूर्वी प्रथम मलकापूर रेल्वे स्टेशनवर NAC राष्ट्रीय संघर्ष समिती बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने संजयसिंग राजपूत, जिल्हा सम्वयक ए के राऊत, जिल्हा सहसचिव यांनी तर NAC मलकापूर तालूकाच्या वतीने एम डी देशपांडे, तालुका उपाध्यक्ष व एम ई फिरके तालुका कोषाध्यक्ष यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. सदर प्रसंगी रा.प मलकापूर आगार व्यवस्थापक नाव्हकर यांनी NAC टीमच्या सुखकर प्रवासासाठी पाठविलेल्या एसटी बस चे चालक, वाहक व वाहतूक नियत्रंक यांचे पण NAC तर्फे स्वागत करून आभार व्यक्त केले.
त्यानंतर बुलडाणा येथे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांनी त्यांचे निवासस्थानी पुणे टीम चे आदरातिथ्य केले. त्यानंतर सैनिक मंगल कार्यालयात एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत होते. या सभेत सर्वप्रथम पुणे जिह्यातील पदाधिकारी यांना यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांनी देखील कमांडर साहेबांचा सन्मान केला. त्यानंतर प्रास्ताविक मुख्य समन्वयक विलास पाटील यांनी केले तर सभेला राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत, राष्ट्रीय उपाध्यक्ष काझी, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रकाश मिरगे, जेष्ठ नेते दत्तात्रय वानखेडे, जिल्हा समन्वयक अशोक दाभाडे, पुणे जिल्हा समन्वयक अजितकुमार घाडगे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंद्रसिंग राजपूत, उपाध्यक्ष तानाजी काळभोर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुलढाणा जिल्हा सचिव पी आर गवई यांनी केले तर आभार पिंपरी-चिंचवड महिला शहर अध्यक्षा पुनमताई गुजर यांनी मानले.
या सभेला व्यासपीठावर बारामती तालुकाध्यक्ष प्रताप सातपुते, खेड तालुकाध्यक्ष दिलीप कहाणे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती शोभाताई आरास, पश्चिम भारत महिला संघटन सचिव सौ सरिताताई नारखेडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र सचिव सुधिर चांडगे, कोषाध्यक्ष बी एस नारखेडे, जेष्ठ नेते जे जे गरकल, तालुकाध्यक्ष एस एन बैरवार, तालुका सचिव महावीर काळे, NAC नेते आर आर पाटील, पी एन चव्हाण, एस पी इंगळे, डी सी खर्चे, जे जी मछ्ले, डी के पिंपळे, ए एन लांडे बुलडाणा टीमने परिश्रम घेतले.