महात्मा फुले कृषि विद्यापीठाकडून शेतकऱ्यांना फवारणी पंपाचे वाटप
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत कंसोर्टीया रिसर्च प्रोजेक्ट, आय.ओ.टी. सक्षम व सेन्सर आधारित अद्ययावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली प्रकल्प अंतर्गत फवारणी पंप वाटप कार्यक्रम इगतपुरी येथील विभागीय कृषि संशोधन केंद्रामध्ये करण्यात आला.
यावेळी इगतपुरी येथील विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. हेमंत पाटील, मफुकृवि, राहुरी येथील स्मार्ट इरीगेशन प्रोजेक्टचे प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक इंजि. तेजश्री नवले व इंजि. विशाल पांडे उपस्थित होते. याप्रसंगी कंसोर्टिया रिसर्च प्रोजेक्ट, आय ओ टी सक्षम व सेन्सर आधारित अद्ययावत सिंचन व्यवस्थापन प्रणाली या प्रकल्पाअंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना यातील 31 शेतकर्यांना फवारणी पंपाचे वाटप व विभागीय कृषि संशोधन केंद्र, इगतपुरी यासाठी शेतकर्यांना शेतीसंबंधी विविध माहिती व प्रशिक्षण देण्याकरिता स्मार्ट टी व्ही व वायरलेस साऊंड सिस्टिम देण्यात आली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहयोगी संशोधन संचालक डॉ. हेमंत पाटील यांनी उपस्थित शेतकर्यांचे स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत कशी सांगड घालता येईल याबद्दल उपस्थित शेतकर्यांना संबोधित केले. याप्रसंगी स्मार्ट इर्रीगेशन प्रोजेक्टचे प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व त्याचा उपयोग यासंबंधी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी परिसरातील लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.