ठळक बातम्या

शासनाने जिल्ह्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करावा – सुरेशराव लांबे पाटील

राहुरी – तालुक्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी या मागणीसह ज्या शेतकऱ्यांनी काही तांत्रिक कारणांमुळे पीक विमा काढू शकले नाही, त्यांनाही विम्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी तहसीलदार राजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांवर कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांबरोबर चालू हंगामात पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटुनही पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची खरिपातील पेरणी झाली नाही. तुरळक ठिकाणी अल्प प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे काही भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे कांदा, कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, व जनावरांची चारा पिके जाळून चालली आहेत. त्यातच शेत मालाबरोबर शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या दुधालाही भाव नसल्याने शेतकरी वर्ग व सर्वसामान्य नागरिकांवर आत्महत्येची वेळ आली आहे.

या सर्व परिस्थितीचा शासन व प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून त्वरित दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी. तसेच राष्ट्रीय प्रधान विमा फसल योजने अंतर्गत १ रुपयात विमा आहे, परंतु काही शेतकरी तांत्रिक अडचणींमुळे या योजनेत भाग घेऊ शकले नसल्याने त्यांना ही या योजनेचा ७/१२ वरील ई पीक नोंदीनुसार लाभ मिळावा. तसेच गेल्या चार वर्षांपासून कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफी, कृषी पंपाचे संपूर्ण विज बिल माफ करून तेलंगणा व मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे कृषी पंपाना मोफत वीज पुरवठा करण्यात यावा. तसेच मुक्या जनावरांसाठी त्वरित छावण्या सुरू करून पशुपालकांना दिलासा द्यावा, अशा मागण्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील शेतकरी नेते व प्रहार तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी केली आहे.

शेतकरी अडचणीत असताना गेल्या वर्षीचेच अतिवृष्टीचे अनुदान अजुनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. पहिले ते अनुदान त्वरित जमा करावे. तसेच कृषी पंपाचे संपूर्ण वीज बिल माफ करून तेलंगणा व मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे कृषी पंपाना मोफत वीज पुरवठा करण्यात यावा. ही मागणी विरोधात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार  यांनी केलेली होती. आता ती मागणी सत्ता असल्याने त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी लांबे पाटील यांनी केली आहे.

यावेळी राहुरी कारखान्याचे संचालक विजयकुमार डौले, साईनाथ पाटील लांबे, यमुनाताई भालेराव, माया पठारे, भारत संजय जगधने, प्रशांत सप्रे, भानुदास गायकवाड, लक्ष्मण गायकवाड आदींसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, कृषी मंत्री, प्रहार पक्ष्याचे संस्थापक अध्यक्ष आ. ओम प्रकाश बच्चू कडू, अहमदनगर जिल्हा अधिकारी यांना देण्यात आल्या.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button