अहमदनगर

महात्मा बसवेश्वरांची सर्वधर्म समभावाची शिकवण अंमलात आणणे गरजेचे – शिवाजीराव कपाळे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : वीरशैव किंवा लिंगायत पंथाचे मुख्य प्रवर्तक महात्मा बसवेश्वर हे विश्वमानव होते. नव्या युगाचे क्रांतिकारक होते, त्यांनी सांगितलेली लोकशाहीयुक्त समाजपोषक विचारधारा, सर्वधर्म समभावाची शिकवण अंमलात आणणे गरजेचे असल्याचे मत राहुरी येथील वीरशैव समाजाचे नेते, साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी व्यक्त केले.

येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे माऊली वृद्धाश्रमात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव कपाळे बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्रतिमापूजन, दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे समन्वयक, मार्गदर्शक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी उपक्रमाची संकल्पना विशद केली. श्रीरामपूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष संदेश शाहीर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.त्यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यांचा सत्कार करण्यात आला.

विषय तज्ञ डॉ.विवेकानंद बागले यांनी ‘वीरशैव समाज आणि पार्श्वभूमी’, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘महात्मा बसवेश्वर यांचे समता व एकता विचार’, कवयित्री संगीता फासाटे यांनी ‘महात्मा बसवेश्वर आणि शिव ‘तर सुखदेव सुकळे यांनी ‘महात्मा बसवेश्वर यांचे स्त्रीविषयक विचार’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे, सौ.कल्पनाताई वाघुंडे यांनी वृद्धाश्रमाची माहिती देऊन पाहुण्यांचा सत्कार केले.

शिवाजीराव कपाळे यांनी अशा आगळ्यावेगळ्या चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल सुखदेव सुकळे यांचे कौतुक केले. माऊली वृद्धाश्रमाचे सेवाभावी कार्य पाहून 11 हजार रुपये देणगी दिली. सुखदेव सुकळे यांनी 2 हजार रुपये देणगी दिली. यावेळी माजी प्राचार्य शन्करराव अनारसे, स्वाध्याय परिवाराचे कचरू निकम, वृद्धाश्रमातील दत्तात्रय खिलारी, आरोग्यमित्र सुभाष गायकवाड आदिंनी चर्चेत भाग घेत मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य टी. ई. शेळके म्हणाले, माऊली वृद्धाश्रमातील आजी, आजोबा हे जुने, जाणते, अनुभवी लोक आहेत.

आश्रमात सर्वधर्म समभाव जपला जातो, भक्ती आणि जीवनशक्तीची विचारधारा लवकरच रुजणारी आहे, त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांची जयंतीचे आयोजन योग्य असल्याचे सांगून त्यांनी सुखदेव सुकळे यांच्या नाविण्यपूर्ण कार्यक्रमाचे कौतुक केले. सुयोग बुरकुले, शुभम नामेकर, जयश्री श्रीवास्तव, रमेश राऊत यांचा सन्मान करण्यात आला. सुरेश गड्डे गुरुजी, शंकरराव वाडणकर, सुरेश कल्याणकर, विशाल निकडे, ॲड. लिंगे, विलास जँगम, वृद्धाश्रमातील आजी, आजोबा आदिंनी चर्चासत्रात भाग घेतला. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सुखदेव सुकळे यांनी आभार मानले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button