कृषी

फुले बळीराजा डिजीटल कृषि सल्ला प्रणाली प्रत्येक शेतकर्यांपर्यंत पोहचणे गरजेचे – संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार

राहुरी विद्यापीठ : शेतकर्यांना कृषि विषयक सल्ला वेळेवर मिळणे महत्वाचे असून विद्यापीठाने तयार केलेली फुले बळीराजा ही डिजीटल कृषि सल्ला देणारी प्रणाली स्थानिक परिस्थितीनुसार वेळेवर व अचूक सल्ला देणारी आहे. भारत सरकारच्या डिजीटल भारत संकल्पनेला महात्मा फुले कृषि विद्यापीठाने तयार केलेले फुले बळीराजा हे ॲप पुरक असून ते प्रत्येक शेतकर्यांपर्यत पोहचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी केले.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कृषि विद्यापीठ, जी.आय.झेड., मॅनेज आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने फुले बळीराजा या डिजीटल कृषि सल्ला प्रणालीची ओळख या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या परिसंवाद सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. सुनिल गोरंटीवार बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन हैद्राबाद येथील मॅनेज संस्थेचे आय.टी. विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. जी. भास्कर उपस्थित होते.

याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, कृषि परिषद पुणेचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. विठ्ठल शिर्के, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कराड कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, नंदुरबार कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले, मुक्ताईनगर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश गायकवाड, प्रो-सॉईल प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, जी.आय.झेड.चे तांत्रिक मार्गदर्शक इंजि. रणजीत जाधव हे उपस्थित होते. यावेळी जी.आय.झेड.चे वरिष्ठ सल्लागार नविन होरो व हिमांशू वर्मा हे ऑनलाईन उपस्थित होते.

यावेळी डॉ. भास्कर म्हणाले की या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना या फुले बळीराजा प्रणालीची पुरेशी माहिती मिळणार आहे. या संदर्भात फुले बळीराजा प्रणालीवरील विद्यापीठातील व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना मॅनेज, हैद्राबाद संस्थेतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याप्रसंगी डॉ. तानाजी नरुटे यांनी दिवसेंदिवस बदलणारे हवामान व त्याचा शेतीवर होणारा परिणाम यावर फुले बळीराजा प्रणाली फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले. विस्तार कार्यकर्त्यांनी या फुले बळीराजा प्रणालीचा अभ्यास करुन ती अवगत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. बापुसाहेब भाकरे म्हणाले की आजचा प्रगतशील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाची मागणी करणारा आहे. अशा शेतकर्यांसाठी फुले बळीराजा हे डिजीटल कृषि सल्ला देणारी प्रणाली त्यांच्या अपेक्षा पुर्ण करणारी आहे. सध्या शेतकर्यांसमोर उत्पादन हा प्रश्न नसून त्यांनी तयार केलेल्या कृषि मालाचे विपणन कसे करायचे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असतो यावर ही प्रणाली उपाय ठरु शकेल. याप्रसंगी नविन होरो यांनी ऑनलाईन संवाद साधला. या कार्यशाळेच्या दुपारच्या तांत्रिक सत्रात हिमांशू वर्मा व विश्वंभर राणे यांनी फुले बळीराजा या प्रणालीच्या कार्यपध्दती विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. मुकुंद शिंदे यांनी कार्यशाळेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अवधुत वाळुंज यांनी तर आभार जी.आय.झेड. प्रो-सॉईल प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. गोकुळ वामन यांनी मानले. या कार्यशाळेसाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, घटक कृषि महाविद्यालयांचे प्रतिनिधी व कार्यक्षेत्रातील कृषि विज्ञान केंद्रांचे विषय विशेषज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button