प्रासंगिक

“माणसे जोडणारी मानवतावादी प्रयोगशाळा” म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर

( प्रा. डी. ए. माने; विसापूर तासगाव ) लोकनेते रामशेठ ठाकूर हे कोकणचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या जीवनाची सुरुवात अगदी शून्यातून झाली. मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला, त्यांना त्यांच्या सरांनी सांगितले. सातारला कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेले छत्रपती शिवाजी कॉलेज आहे. तेथे ‘कमवा व शिका’ योजना आहे. तेथे स्वावलंबी शिक्षण घेता येते. रामशेठने उच्च शिक्षणासाठी सातारला जाण्याचा निश्चय केला. ते सह्याद्रीचा खंडाळा, लोणावळा घाट चढून सातारला आले. त्यांच्या जीवनाची नवी अशी सफर सुरू झाली. सातारला त्यावेळी बापूसाहेब उनउने छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य होते. प्राचार्यांनी रामशेठ यांना कमवा व शिका योजनेत प्रवेश दिला. त्यांनी कला शाखेच्या प्री डिग्रीच्या वर्गात प्रवेश घेतला.

रामशेठ ठाकूर यांना छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षणाचे नवे दालन सापडले. आता आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईल. या कल्पनेने त्यांना अतिशय आनंद झाला. तशात प्राचार्य एस. के. उनउने म्हणजे देव माणूस होय. प्राचार्य उनउने कर्मवीरांचे खरे वारसदार होते. उनउने बापूची मायेची सावली रामशेठ ठाकूर यांना लाभली. त्यांच्या प्रेमळ सहवासात रामशेठ ठाकूर यांच्या जीवनाची जडण-घडण सुरू झाली. १९६८ ते १९७२ अशी चार वर्षे बी. ए. पर्यंत शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये घेतले. तेथे त्यांना उनउने बापूनी आई-वडिलांचे प्रेम दिले. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना रामशेठ ठाकूर यांनी म्हटले आहे. ” उनउने बापूंचा आदर्श घेऊन माझ्या आयुष्याची वाटचाल केली आहे. त्यांचा मला खूपच फायदा झाला आहे. बापूंच्यामुळे मी राम ठाकूरचा रामशेठ ठाकूर झालो आहे. माझ्या जीवनामध्ये बापूंच्या आचार विचारांचा प्रभाव आहे, त्यांचा मला चार वर्षे सहवास मिळाला. त्यामुळे माझे भविष्य घडले आहे.” अशा प्रकारे उनउने बापूंचा आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांचा वारसा घेऊन, त्यांच्या जीवनाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. यशवंतराव चव्हाणांच्या भाषेत सांगायचे तर, त्यांच्या जीवनाची लंबी सफर सुरू आहे. ही लंबी सफर सामान्य, गोरगरीब लोकांना आधारवड झाली आहे.

कर्मवीर अण्णांना वाटायचे. माझ्या रयतेचे विद्यार्थी, माझ्या बोर्डिंगचे विद्यार्थी, माझ्या कमवा शिका योजनेचे विद्यार्थी दिल्लीच्या संसदेमध्ये जावेत. मला वाटते कर्मवीर अण्णांची ती इच्छा रामशेठ ठाकूर यांनी पूर्ण केली. रामशेठ ठाकूर दोन वेळा प्रचंड मताने विजयी होवून लोकसभेत गेले. छत्रपती शिवाजी कॉलेजमधील ‘कमवा व शिका’ या योजनेतील एक सामान्य कुटुंबातील मुलगा संसद सदस्य झाला. भारताच्या लोकशाही मंदिराचा मानदंड झाला. रयतेचा झेंडा दिल्ली दरबारी फडकला. मला वाटते. आजच्या मंगल प्रसंगी ही आठवण “आनंदाच्या डोही आनंद- तरंग निर्माण करणारी आहे.

आज रामशेठ ठाकूर कर्तबगारीने श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. श्रीमंत अनेकजण असतात. पण त्यातील फार थोडे दिलदार असतात. फार थोडे दानशूर असतात. हा दानशूरपणाचा संस्कार कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यावेळेचे प्राचार्य एस. के. उनउने यांच्याकडून त्यांना मिळाला आहे. प्राचार्य बापूजी ज्या मुलाकडे साबण नाही, तेल नाही अंथरून- पांघरून नाही त्यांना पैसे द्यायचे. या सगळ्या घटनांचा त्यांच्या मनावर संस्कार झालेला आहे. त्यामुळेच आपणाला जे मिळाले आहे. त्यातील काही आपण दुसऱ्याला देत राहिले पाहिजे. या भावनेने ते काम करत असतात, दान देत असतात. पुढील जीवनात जनार्धन भगत साहेबांनी पण हेच संस्कार त्यांच्यावर केले आहेत. भगत साहेबांच्या मुळेच रामशेठ ठाकूर राजकारण व समाजकारणाचे मानबिंदू ठरले आहे. त्यामुळे आज ही शेकडो विद्यार्थी-पालक, संस्था चालक, वेगवेगळ्या मंडळाचे चालक, गरीब विद्यार्थी त्यांच्याकडे मदतीसाठी येतात. रामशेठ ठाकूर यथाशक्ती सर्वांनाच मदत करतात. आज “कोणालाही विन्मुख पाठवायचे नाही” या ब्रीद वाक्याचे ते मानकरी ठरले आहे.

आज रामशेठ ठाकूर हे अवघ्या रयत शिक्षण संस्थेला आपल्याच घरातला माणूस असे वाटतात. कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था ही अनेक खांबी द्वारका आहे. कर्मवीर अण्णांच्या विचारांचा वारसा चालवीत आहेत. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत जीवा भावाचे सहकारी म्हणून रयतेचे काम करीत आहेत. रयतेच्या अनेक शाखांना लाखो- कोट्यवधीची मदत करत आहेत. रयत शिक्षण संस्थेची अनेक विद्यामंदिरे, महाविद्यालये सुसज्ज बनली आहेत. रामशेठ ठाकूर सर्वांचे आधारवड बनले आहेत.

रामशेठ ठाकूरांचे हे कार्य पाहून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, चेअरमन डॉ. अनिल पाटील व सर्व मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य यांनी मोखाडा कॉलेजचे नामकरण करण्याचा जो निर्णय घेतला आहे. तो अतिशय आनंदाचा आहे. अभिनंदनीय आहे. रयत शिक्षण संस्थेचे हे कॉलेज आता लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मोखाडा, जिल्हा पालघर या नावाने ओळखले जाणार आहे. ही घटना रयत शिक्षण संस्थेच्या इतिहासाची ऐतिहासिक घटना होईल.

रामशेठ ठाकूर आपल्या संस्कारशील कार्यामुळे तुमचे आमचे लोकनेते झालेले आहेत. जनतेने त्यांना लोकनेता ही बिरोदावली दिली आहे. त्यांना जनतेची – रयतेची कामे करण्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला वहिनीला सुपुत्र आमदार प्रशांत ठाकूर आणि परेश यांची मोलाची साथ मिळते आहे. रामशेठ ठाकूर यांचा जीवन प्रवास आनंदाने उत्तुंग ध्येयवादाने चालू आहे.

अशा प्रकारे रामशेठ ठाकूर कोकणचे भूमिपुत्र, पण आता ते केवळ कोकणचे राहिले नाहीत तर रयतेचे झाले आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र झाले आहेत. जनसामान्यांचे नेते झाले आहेत. सर्वांचे आधारवड झाले आहेत. त्यांचे मुख्य कारण त्यांनी आपल्या प्रेमळ वागण्याने व नम्र स्वभावाने अनेक लहान-थोर माणसे अंत:करणाने जोडली आहेत. आज अवघ्या महाराष्ट्रात त्यांचा माणसांचा गोतावळा निर्माण झाला आहे. मी तर म्हणेण “लोकनेते रामशेठ ठाकूर हे माणसे जोडणारी मानवतावादी प्रयोगशाळा आहे.”

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button