प्रासंगिक

सोनगाव येथील शोकसभेत समाजभूषण स्व.सचिन गुलदगड यांना आदरांजली अर्पण

राहुरी : तालुक्यातील सोनगाव येथे श्री संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष, माळी समाजाचे व ओबीसींचे खंदे समर्थक महाराष्ट्र भूषण, समाजभूषण, लोकनेते कै. सचिन भाऊसाहेब गुलदगड यांचे अकाली अपघाती निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि. 26 रोजी सायंकाळी सात वाजता शोकसभेचे आयोजन सोनगाव पंचक्रोशीतील समस्त ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी सोनगाव पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी कै.सचिन गुलदगड यांना श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजली वाहताना अनेकांचे अश्रू अनावर होऊन त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

सचिन गुलदगड यांनी उभे आयुष्य समाजासाठी खर्च करून महाराष्ट्रभर संत सावता माळी युवक संघाच्या माध्यमातून युवकांचे संघटन करून विविध समाज उपयोगी स्पर्धा त्यांनी राबवल्या. त्यामध्ये वधू-वर पालक मेळावा, नेत्रदान व मोतीबिंदू शिबिर, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा अशा एक ना अनेक स्पर्धेचे आयोजन करून संघटनेच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम कै.सचिन गुलदगड यांनी केले. सावता माळी युवक संघाच्या महाराष्ट्रभर गाव तेथे शाखा उभ्या केल्या तसेच ज्या गावांमध्ये संत सावता महाराज याचे मंदिर नाही त्याठिकाणी पुढाकार घेऊन मंदिरे उभारण्याचे काम त्यांनी केले. तसेच ज्या गावांमध्ये सावता महाराजांचा सप्ताह होत नाही किंवा ज्या गावांमध्ये सप्ताह बंद पडला अशा ठिकाणी समाजामध्ये संघटन करून सप्ताह सुरू करण्याचे काम सचिन गुलदगड यांनी केले.

भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या पहाडी आवाजात आदराने जय सावता… जय सावता… बोलून जोपर्यंत समोरची व्यक्ती जय सावता बोलत नाही तोपर्यंत सचिन गुलदगड हे कधीही पुढचे वाक्य बोलत नव्हते. प्रत्येक तरुण नमस्कार नाही तर आता जय सावता म्हणायला लागले आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे आणि ही पोकळी न भरून निघण्यासारखी आहे. संत सावता महाराज, महात्मा फुले यांचे विचार व कार्याची महती समाजाच्या शेवटच्या घटका पर्यंत पोहचवण्याचे काम या अवलियाने केले. त्यांच्या जाण्याने समाज आज हळहळ व्यक्त करत आहे. समाजभूषण नाही तर समाजाचे भूषण हरपलं असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली. अशा या महान लोकनेत्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो त्यांना परमेश्वर चरणी अढळ स्थान मिळो ही प्रार्थना करून त्यांना अखेरचा जय सावता करण्यात आला.

यावेळी सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप, भाजपा ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष बिपिन ताठे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष सूर्यभान शिंदे, सोनगाव सरपंच प्रतिनिधी सुभाष शिंदे तसेच जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे किरण अंत्रे यांनी शब्द सुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली तर नरेंद्र अनाप, संजय शिंदे, महेश पर्वत, दिलीप शिंदे, चंद्रकांत गिते, सचिन अंत्रे, तुषार पठारे, विनोद अंत्रे, बाळासाहेब अंत्रे, बाळासाहेब अनाप, कैलास अनाप, अफजल तांबोळी, प्रशांत अंत्रे, कैलास जाधव, भारत अनाप, गणेश अनाप, संतोष जेजुरकर, अभिषेक ताजने, भालेरायवाडी, लक्ष्मीवाडी, अनापवाडी, माळेवाडी येथील सचिन गुलदगड यांच्यावर प्रेम करणारे अनेक तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button