प्रासंगिक

प्रा. डॉ.हरी रामचंद्र नरके

जन्म 01 जून, 1963 ते 09 ऑगस्ट, 2023

      महाराष्ट्रातील एक प्रभावी वक्ते, विवेकशील जाणिवेचे कार्यकर्ते, अभ्यासू, संशोधक लेखक, समीक्षक आणि माणुसकी संपन्न व्यक्तिमत्व म्हणून प्रा. डॉ.हरी रामचंद्र नरके यांचे व्यक्तित्व आणि साहित्य प्रेरणादायी आहे.

प्रा.डॉ.हरी नरके यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतून अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले. ‘महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा’ हॆ त्यांचे पुस्तक अधिकच लोकप्रिय ठरले. ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ हॆ पुस्तक म्हणजे स्त्रीशिक्षण आणि सावित्रीबाईंचे योगदान यांचा तळवेधी परिचय करून देणारे पुस्तक आहे. महात्मा फुले गौरव ग्रंथाचे केलेले संपादन दिशादर्शक ठरले आहे. त्यांची एकूण 56 पुस्तके प्रकाशित आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे प्राध्यापक होते. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य होते. एक पुरोगामी, नम्र आणि संयमशील विचारवंत म्हणून ते सर्वांना हवेहवेसे वाटत असत.

मी श्रीरामपूर येथील बोरावके कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना 1980 साली त्यांची भेट झाली. आमच्या परिवर्तन मंचच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम हाती घेतले होते. हुंडा निर्मूलन, कष्टची भाकरी केंद्र, झोपडपट्टीच्या मुलांना शिक्षण आणि शिकवण्या, स्त्री अन्याय निवारण लढे, मंजुश्री हत्या प्रकरण आणि स्त्री समस्या चित्र प्रदर्शन, अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम आणि शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, वाचन संस्कृती आणि पुस्तक मेळावे असे कितीतरी कार्यक्रमात ते भेटत राहिले. प्रा. सौ. स्नेहल नेणे, डॉ.सुनील नेणे, सौ.सुजाता अपशन्कर, प्रा. विजयराव कसबेकर, सौ.मेघा किराणे शहरातील अनेक विचारवंत, सेवाभावी डॉक्टर यांचे सहकार्य मिळत असे. रामचंद्र जाधव आणि मी या चळवळीत अधिक सक्रिय होतो.

1982 मध्ये पुणे येथील हमाल भवन येथे झालेल्या प्रबोधन शिबिरात मी श्रीरामपूरचा कार्यकर्ता प्रतिनिधी होतो. प्रा. डॉ.हरी नरके यांची दोन दिवसांची मैत्री घट्ट झाली. नंतर पुण्याला नेहमी भेट होत असे. शिबिरात डॉ.बाबा आढाव, डॉ.नरेंद्र दाभोलकर, संजीवनी धर्माधिकारी, साहित्यिक लक्ष्मण माने, प्रेरणा राणे असे कितीतरी मान्यवरांचा परिचय जीवनाला प्रेरणादायी ठरला.

प्रा.डॉ.हरी नरके हॆ समतेचे आणि लोककल्याणकारी व्यक्तिमत्व होते. मालिका निर्माते, ब्लॉगर लेखक, पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे उपाध्यक्ष, मराठी भाषा ही संस्कृत, कन्नड, तेलगू भाषेप्रमाणेच एक अभिजात दर्जाची भाषा असल्याचा चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, मराठी एक भारतीय अभिजात भाषा समितीचे अहवाल प्रमुख समन्वयक होते. महात्मा फुले हा त्यांचा अभ्यासाचा प्रमुख विषय असला तरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील अनेक सामाजिक चळवळीतील व्यक्तिमत्वाचा त्यांनी घेतलेला शोध प्रेरक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो बायोग्राफीचे केलेले संपादन अभ्यासपूर्ण आहे. महात्मा फुले साहित्याच्या हिंदी, इंग्रजी अनुवादाचे अनेक खंड य. दि. फडके यांच्या सहकार्यातून त्यांनी प्रकाशित केले. 60 विद्यापिठातून त्यांनी चर्चासत्रात दिलेली अभ्यासपूर्ण भाषणे त्यांच्या संशोधनाचे मूल्य अधोरेखित करणारे आहे. हॆ त्यांचे शोधनिबंध महत्वाचे दस्तऐवज आहे. विविध मान्यवर नियतकालिकेतून त्यांचे 100 पेक्षा लेख प्रकाशित झाले आहेत.

प्रा. डॉ.हरी नरके म्हणजे कर्ते सुधारक होते. आईचे ते अधिक लाडके होते. आई सांगेल त्या मुलीशी मी लग्न करेल, असे ते म्हणत. त्यांच्या आईला आपल्या मुलाची पसंती आणि समाज जाणिवा माहित होत्या. आंतरजातीय विवाहाला आईने आशीर्वाद दिला. विवाह साधा पण महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने झाला पाहिजे, तो खर्चिक नको, असे ते म्हणत, तसाच विवाह त्यांनी केला. संगीता आणि हरी नरके यांचा विवाह 01 मे 1986 रोजी संपन्न झाला. त्यांनी पु. ल. देशपांडे यांना आपला विचार सांगितला. तेव्हा पु. ल. देशपांडे यांनी कळविले, “लग्न ही एरंडेल पिऊन स्म्शानात करायची गोष्ट नाही. तो एक आयुष्यातला आनंद सोहळा असतो, तो खर्चिक असू नये, ठीक आहे पण आलेल्यांना तुला जेवण द्यायचे तर अवश्य दे.” असा सल्ला नरके यांना आवडला.

पुणे येथील हॉटेल श्रेयसच्या अंबर सभागृहात फुलेवादी विचाराने, विवाह नोंदणी आणि स्वागत समारंभाने हा संगीता आणि हरी नरके यांचा विवाह अनेकांना प्रेरणादायी ठरला. टेल्को कंपनीत काम करतानाच त्यांनी ओबीसी चळवळीला दिशा दिली, त्यांना 60 वर्षाचे आयुष्य लाभले, हृदयविकारामुळे त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. समाज परिवर्तनाचे एक चालते बोलते ज्ञानपीठ म्हणून प्रा. डॉ.हरी नरके यांचे सामाजिक, साहित्यिक कार्य मौलिक आहे !

_ प्रा. डॉ. बाबुराव दत्तात्रय उपाध्ये,  ‘निर्मिक ‘, 191, इंदिरानगर, श्रीदत्त मंदिराजवळ, श्रीरामपूर जि. अहमदनगर, भ्रमणसंवाद : 9270087640

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button