धार्मिक

हरेगाव येथे इस्टर सणापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम

ख्रिस्ताबरोबर श्रद्धेने मार्गक्रमण करावे-फा.डॉमनिक

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आज झावळ्याचा रविवार आपण साजरा करीत आहोत. प्रायश्चित्त काळातील गेले पाच सप्ताह दयाकृत्ये व आत्मत्याग करून प्रभू येशूच्या पुनरुथान रहस्याच्या उत्सवाची पूर्वतयारी करीत होतो. आज आपण सर्वजण विश्वव्यापी ख्रिस्तसभेबरोबर त्या उत्सवाला प्रारंभ करण्यासाठी जमलो आहोत.

ख्रिस्त आमचा तारणकर्ता होता. त्याला दु:ख मरण व पुनरुथान या अवस्थेतून जाणे गरजेचे होते. यासाठी ख्रिस्ताने मोठ्या विजयाने पवित्र नगरीत प्रवेश केला. त्यामुळे आमच्या तारणकार्याला सुरुवात केली. त्या प्रवेशाचे आज आपण भक्तीभावाने स्मरण करून ख्रिस्ताबरोबर श्रद्धेने मार्गक्रमण करू या, असे प्रतिपादन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ यांनी केले.

रविवारी हरेगावातून डी कॉलनीपासून सर्वांनी झावळ्या हातात घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मतमाउली भक्तीस्थानात इस्टर सणापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि २४ फेब्रु. ते ५ एप्रिल पर्यंत क्रुसाच्या वाटेची भक्ती दर रविवारी घेण्यात येत आहे.

२६ फेब्रु. ते २६ मार्च पाच रविवार उपवास काळ उपासना विधी, २ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वा. झावळ्याचा रविवार, ६ एप्रिल आज्ञा गुरुवार, ७ एप्रिल सकाळी ७ वाजता गुड फ्रायडे दिनी क्रुसाच्या वाटेची भक्ती, सात शब्दावर मनन चिंतन सायंकाळी ५ वा प्रभूच्या दु:ख सहनाचा विधी, ८ एप्रिल पास्काचा जागरण विधी, इस्टर दिनी सकाळी पास्काचा सकाळचा विधी होईल.

या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन संत तेरेजा चर्च हरिगाव प्रमुख धर्मगुरू डॉमनिक, सचिन, रिचर्ड, तसेच धर्मभगिनी, चर्च कौन्सिल सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button