अहमदनगर

महिला सबलीकरण हा युगधर्म झाला पाहिजे – सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : स्त्री ही युगकर्ती आणि निर्मिकमूर्ती आहे, तिचा सन्मान हा आदर्श संस्कृतीचा सन्मान आहे, प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील यांनी कारेगावसारख्या छोट्या गावात स्त्री सन्माननिमित्त आयोजित केलेले विविध कार्यक्रम महिलांच्या उन्नतीला पूरक ठरणारे आहेत, असे मत श्रीरामपूर पंचायत समिती सदस्या डॉ. सौ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी व्यक्त केले.
कारेगाव येथील भाऊसाहेब भवार पाटील जनसेवा केंद्राने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी आयोजित विविध कार्यक्रमाचे उदघाटन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अँड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ.उषाताई भवार, सुभाष वाघुंडे, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा. शिवाजीराव बारगळ, पत्रकार राजेंद्र देसाई, कवी आनंदा साळवेे, प्रसिद्ध गायक दिलावर शेख आदींसह सन्मानीय महिला उपस्थित होत्या.
डॉ. वंदनाताई मुरकुटे, अध्यक्ष प्राचार्य शेळके व पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. प्राचार्य भाऊसाहेब भवार पाटील यांनी बहुउद्देशीय सभागृह आणि जनसेवा केंद्रातर्फे महिला आरोग्यशिबिरे, मदत केंद्र, शिक्षण, प्रबोधन उपक्रम आणि नियम यांची माहिती देत स्वागत, प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार केले. डॉ. वंदनाताई मुरकुटे, साकुर येथील प्राचार्या गुलशन जमादार, अल्फीया शेख, त्यांचा सर्व परिवार, कवयित्री संगीता फासाटे, माऊली वृद्धाश्रमाच्या प्रमुख सौ. कल्पनाताई वाघुंडे, सौ. उषाताई भवार, सौ. अनिताताई भवार इत्यादी कर्तृत्ववान महिलांना स्त्री सबलीकरण सन्मानचिन्ह, शाल, पुस्तके, गुलाबबुके देऊन सन्मान करण्यात आले.
डॉ. बाबुराव उपाध्ये, प्रा.शिवाजीराव बारगळ,प्राचार्या गुलशन जमादार ,राजेंद्र देसाई यांनी ‘आजचे जग आणि महिला सबलीकरण ‘याविषयी प्रबोधनपर व्याख्याने दिली. कवी आनंदा साळवे, लेविन भोसले, संगीता फासाटे, दिलावर शेख आदिंनी कवितावाचन, गायन केले. उदघाटक डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी मनोगतात सांगितले, कवी हा संवेदनशील मनाचा असतो, मनातले, जगातले विषय तो प्रभावीपणे थोड्या शब्दांत मांडून जगाला अंतर्मुख करतो, आता साहित्य संमेलन भरवून अधिक साहित्यिकांना सहभागी करून घ्यावे असे आवाहन केले.
प्राचार्य शेळके यांनी अध्यक्ष भाषणातून महिला सबलीकरण काळाची गरज असून ग्रामीण स्त्रीजीवनाला अधिक सक्षम करण्यासाठी जनसेवा केंद्र कार्य करीत आहे, त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले. अमोलराजे भवार यांनी ग्रामस्थ, साहित्यिक, सन्मानीत महिला, सहकारी असे सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button